परीक्षा आहे म्हणून फोन काढून घेतला आहे, आता मित्रांशी कसं बोलू?

डाॅ. श्रुती पानसे

image : brgfx

परीक्षा आहे म्हणून फोन काढून घेतला आहे, आता मित्रांशी कसं बोलू?

इथे आधी विचार यांचा करावा लागेल की आईबाबांनी असं का केलं असेल? अभ्यास करण्यासाठी त्यांनीच आपल्याला फोन घेऊन दिला, मग आत्ताच का काढून घेतला असेल? 

  • कधी कधी आपण खूप जास्त वेळ मोबाईलवर वेळ वाया घालवतो. 
  • गेम्स खेळण्यात वेळ घालवतो.
  • उगाचच काही बाही बघत बसतो. तर कधी मित्रांशी / मैत्रिणींशी खूप वेळ गप्पा मारत बसतो. 
  • आपण अभ्यास करण्या ऐवजी मोबाईलवर जास्त वेळ असतो. 
  • एकदा मोबाईल हातात घेतला की त्यात किती वेळ गेला याचं आपल्याला भानच राहत नाही. अर्धा तास – एक तास सुद्धा कसा गेला हे समजत नाही. 

अशा काही कारणांसाठी  आईबाबांना हातातला मोबाईल काढून घ्यावा लागतो. कारण अभ्यासात एकाग्रता राहत नाही. त्यामुळे आपण मोबाईलवर नक्की काय करतो? हे स्वत:चंच तपासून बघा. 

मोबाईल काढून घेतला नाही तर आपला अभ्यासच होणार नाही. आपल्याला जास्त वेळ अभ्यासच करायचा आहे.  

 

हेही वाचा!

https://urjaa.online/why-cant-i-remember-what-i-studied/

अभ्यासाचा आणि परीक्षेचा काळ संपल्यावर सुट्टी लागणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला मोकळा वेळ असणार आहे, तेव्हा नवं काही शिकण्यासाठी मोबाईल मिळू शकतो. जी मुलं मोबाईल फोनचा उपयोग खेळण्यासारखा करतात, त्यांना फोन मिळत नाही. जी मुलं थोडक्या वेळासाठी आणि काम किंवा अभ्यास यासाठी वापरतात, त्यांना तो परीक्षेच्या काळातही थोडा वेळ मिळतो. आता यातलं आपण काय करतो, हे स्वत:च तपासून बघा. 

याशिवाय महत्वाच्या एखाद्या विषयावर मित्रांशी बोलायचं असेल, त्यांना काही विचारायचं असेल किंवा त्यातली पीडी एफ बघायची असेल तर आईबाबांना सांगा. त्यासाठी ते तुम्हाला नक्कीच फोन देतील. मात्र काम झाल्या क्षणी फोन जागेवर ठेवून अभ्यासाला बसा. ते होत नाही म्हणून आईबाबा रागावतात.   

सर्वात महत्वाचं म्हणजे जी गोष्ट आपलं नुकसान करते ती बाजूला ठेवायची असते. आणि जी गोष्ट फायद्याची असते तिला जपायचं असतं. मग आता कोणती गोष्ट आपल्या फायद्याची आहे आणि कोणती नुकसान करू शकते, याची निवड आईबाबांनी तरी का करायला हवी? ती आपली आपल्याला समजतेच. त्यात अवघड असं काहीच नाही. ही निवड अगदी सोपीच आहे. अभ्यासाच्या काळात , त्यातही वार्षिक परीक्षेच्या आधी किंवा वार्षिक परीक्षा चालू असताना मोबाईल जास्त वेळ बघणं हिताचं नाहीच. ते टाळायलाच हवं.  

लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.

shruti.akrodcourses@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 9112050500
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact