ट्यूशन लावल्याशिवाय अभ्यास होणारच नाही असं आई बाबांना का वाटतं?

Image: freepik

आई-बाबा ट्यूशन लावण्याचा आग्रह का करतात? मला घरी अभ्यास का करु दिला जात नाही?-
प्रणव पाटील, सेंट फ्रान्सिस हायस्कूल, नाशिक

- सध्या शिक्षणात स्पर्धा खूप वाढली आहे. चांगले गुण मिळाल्याशिवाय आपल्याला जिथे हवी आहे तिथे ॲडमिशन मिळत नाही ही गोष्ट आई बाबांना खूप टेन्शन देते. आणि ट्यूशन लावल्याशिवाय चांगले मार्क्स मिळणारच नाहीत असा त्यांचा समज झालेला असू शकतो. त्यातून ते तुला ट्यूशन लावण्याचा आग्रह करत असावेत.

- शाळेत एका वर्गात खूप विद्यार्थी असतात. शिक्षकांना शिकवताना सगळ्यांचा एकत्रित विचार करुन शिकवावं लागतं. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं शिक्षकांना शक्य होईलच असं नाही. तुझी अभ्यासात प्रगती होण्यासाठी शिक्षकांचं तुझ्याकडे बारीक लक्ष हवं आणि ते ट्यूशन लावली तरच शक्य आहे असं आई बाबांना वाटत असेल.

- शाळेतून घरी आल्यावर मुलांनी जबाबदारीने अभ्यास करणं, सराव करणं गरजेचं असतं. घरी मोबाइल, टीव्ही यात वेळ जाऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असेल किंवा काही विषय कच्चे असतील तर ट्यूशनच बरी, तिथे तरी अभ्यास नीट होईल या विचाराने ट्यूशन लावली जाते

- शाळेपेक्षा ट्यूशनमध्ये शिक्षक बारकाईने शिकवतात, मुलांना काय अवघड जातंय याचा विचार केला जातो. मुलांची अभ्यासाची सवय, अभ्यास करण्याची त्याची /तिची क्षमता या सगळ्या गोष्टी पाहून कसं शिकवायचं याचा विचार शाळेपेक्षा ट्यूशनमध्ये जास्त होतो असा हल्ली सगळ्यांचाच समज झालेला आहे. तुझी अभ्यासातली कोणतीच गोष्ट कच्ची राहायला नको या काळजीपोटी आई बाबा तुला गरज नसतानाही ट्यूशनला जाण्याचा आग्रह करत असतील.

- आई बाबा अनेक कारणांमुळे मुलांचा सर्वच अभ्यास घेऊ शकत नाही. किंवा अभ्यासात काही अडचणी आल्या तर सोडवू शकत नाही. पण तुझा जर ट्यूशनशिवाय चांगला अभ्यास होत असेल तर तसं तू आई बाबांना सांगायला हवं. ट्यूशनशिवाय तुला चांगला अभ्यास जमतो हे जर तू त्यांना दाखवून दिलं तर कदाचित ते तुला ट्यूशन लावण्याचा आग्रह करणार नाही.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact