मनाचा मित्र
रुचिरा दर्डा,
संस्थापक, पॅरेंट विथ पर्पज.

आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी आहे, शाळा नाही, अभ्यास नाही… नुसती मज्जा आणि धम्माल. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्यासाठी आईबाबा घरी का थांबत नाहीत? ते का ऑफीसला जातात? मी घरी त्यांना 'मिस' करतो.
- आदित्य, नवी मुंबई
हाय आदित्य, आपल्याला सुट्टी असताना आईबाबांना ऑफीसला जावं लागतं, तेव्हा खूप कंटाळा येतो, चिडचिड होते, उदास पण वाटतं. घरी असताना आईबाबा आपल्याला शिस्तीसाठी ओरडले, हे करु नको-ते करु नको म्हणाले म्हणून त्यांची कटकट वाटली तरी ते घरी नसताना मात्र त्यांची खूप आठवण येते, एकटं वाटतं हे मी समजू शकते.
हेही वाचा!
परीक्षेनंतर रिझल्टची भीती वाटतेय! सुटीची मजा कशी घेऊ?
पण तुला खरं सांगू का? तुला सुट्टी आहे म्हणून सुट्टी घेऊन घरी थांबायचा 'ऑप्शन' आईबाबांकडे असला असता तर त्यांनी नक्की ते केलं असतं. त्यांनाही आवडलंच असतं की घरी थांबून तुझ्याबरोबर धमाल मस्ती करायला. पण आईबाबा ऑफीसला का जातात तुला माहिती आहे? ते ऑफीसला जातात म्हणून त्यांना पैसे मिळतात. छान घर, घरी भरपूर खाऊ, सुट्टीत फिरायला जाणं, चांगल्या शाळेत जाणं, चांगली वह्यापुस्तकं, आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जायला आणि औषध घ्यायला आपल्याला पैसे लागतात. आईबाबा ऑफीसला गेलेच नाहीत तर त्यांच्याकडे पैसे येणार नाहीत, आणि पैसे आले नाही तर ही सगळी मज्जा तुला कशी करता येणार? त्यामुळे ते ऑफीसला जातात, पैसे मिळवतात हेही तुझ्यासाठीच करतात, त्यामुळे त्यांना ऑफीसला तर जावंच लागणार, कळतंय का तुला?
अर्थात्, म्हणून तुला जे वाटतंय त्यात काही चूक नाही. तुझं आईबाबांवर खूप प्रेम असल्यामुळेच तुला ते सुट्टीत घरी तुझ्याबरोबर असायला हवेत असं वाटतं, आणि हे खरंच खूप छान आहे. मग आता तू काय करु शकतोस?
तुला घरी असताना आईबाबांची आठवण येते हे तू त्यांना नक्की सांग. ते घरी नसतात याबद्दल तक्रार करु नकोस, पण माझ्या सुट्टीत आपल्याला थोडा वेळ एकत्र घालवायला मिळाला तर मला खूप मजा येईल, हे सांग. रोज ते घरी आल्यावर दहा मिनिटं निवांत त्यांच्याशी गप्पा मार किंवा रात्री जेवतानाही असा निवांत वेळ तू त्यांच्याबरोबर घालवू शकतोस. शनिवार-रविवारी आईबाबांना सुट्टी असेल तर काय करायचं, हेही तुम्ही ठरवू शकता. तुला सुट्टी आहे म्हणून आईबाबांनी तुझ्याबरोबर दिवसभर घरी बसण्यापेक्षा ते घरी असतानाचा वेळ तुम्ही कसा घालवता हे महत्त्वाचं आहे.
सुट्टी असली तरी आपल्याला करायला काहीच नसेल तर कंटाळा येतो. त्यामुळे शाळा असताना ज्या ज्या गोष्टी तुला करायला मिळत नाहीत त्यांची एक यादी कर आणि त्या गोष्टी या सुट्टीत नक्की कर. म्हणजे नुसतंच आईबाबांची वाट बघत बसण्यात तुझा वेळ वाया जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुला सुट्टी आहे तरी आईबाबा रोज ऑफीसला जातात म्हणजे त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असा अर्थ होत नाही, उलट त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम असल्यामुळेच, त्यांना हे करावं लागतं, हे लक्षात ठेव. ओक्के?
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही पण मनातून खूप भीती वाटतेय असं काहीतरी मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणींना सांगायला कसंतरीच वाटतं ; असं जे जे सिक्रेट तुमच्या मनात दडवलेलं असेल ते सगळं 'ऊर्जा'च्या कानात सांगा. तुम्ही काहीही, कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सिक्रेट ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact
-


