
आईबाबा खेळण्यापेक्षा अभ्यासच कर म्हणतात. हे बरोबर आहे का?
-अभिमान इंगोले, सुशीलादेवी देशमुख प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, छत्रपती संभाजी नगर
- शाळेत जाणाऱ्या मुलांनी भरपूर खेळायला हवं आणि खूप अभ्यासही करायला हवा. पण तू सतत खेळत राहिलास तर तुझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असं आईबाबांना वाटत असेल. म्हणून ते तुला अभ्यास कर असं सतत सांगत असतील.
- तू अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टी छान बॅलन्स करतोस असं आई बाबांच्या लक्षात आलं तर ते तुला खेळू नकोस असं अजिबात सांगणार नाहीत. तुला मोठं होऊन चांगलं करिअर करायचं असेल तर तुला अभ्यास करायलाच हवा. पण अभ्यास करायचा म्हणजे मैदानी खेळ खेळायचे नाहीत, तुला जे आवडतं ते करायचं नाही असं अजिबात नाही. अभ्यास आणि खेळ, अभ्यास आणि तुझी आवड निवड यात तुला समतोल राखता यायला हवा. तो एकदा जमला की खेळायच्या वेळेस बाहेर पडताना आई बाबा तुला नक्कीच टोकणार नाहीत. खेळ, छंद हे देखील महत्त्वाचे असले तरी शालेय वयात अभ्यासही तितकाच महत्त्वाचा असतो. अभ्यास, खेळ, छंद यांना पुरेसा वेळ कसा देता येईल याची काळजी तुलाच घ्यावी लागेल. अभ्यास महत्त्वाचा की खेळ अशा गोंधळातून बाहेर पडून अभ्यास आणि खेळाला पुरेसं महत्व देणं तुझं तुलाच जमायला हवं.
- तुझ्या आवडीच्या एखाद्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तेव्हा तुझे परीक्षेतले मार्क्स बघितले जातील. त्यामुळे आईबाबा अभ्यास कर असं सांगतात ते बरोबरच आहे. पण ते तुला बाहेर जाऊन खेळू नकोस असं म्हणत असतील तर ते चूक आहे.
- मैदानावर भरपूर खेळल्यामुळे तुझा स्टॅमिना वाढेल. तुझ्यात संघभावना, यश-अपयश स्वीकारायची तयारी, मेहनत, जिद्द असे गुण वाढीस लागतील. त्यामुळे खेळायलाही हवंच, फक्त खेळताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी तुला घ्यावीच लागेल.
- खेळ आणि अभ्यास यांना किती वेळ द्यायचा हे ठरवणारं एखादं टाईमटेबल तयार कर. ते करताना आईबाबांची मदत घे. म्हणजे तू अभ्यासालाही महत्त्व देतोस हे त्यांना कळेल आणि ते तुला खेळायला जाऊ नकोस असं म्हणणार नाहीत.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


