लहानांनी केलेल्या चुकीची शिक्षा मोठ्या भावंडांनाच.. त्यांची चूक तरी काय असते?

Image: freepik.

चूक लहान भावंडांनी केली तरी मार/शिक्षा/बोलणी मोठ्या भावंडांच्याच वाट्याला,असं का?

- सार्थक खडके, पोदार इंटरनॅशनल स्कूल ,धाराशिव

- लहान भावंडं मोठ्या भावंडांना घाबरतात, ते सांगतील ते ऐकतात. यामुळे मोठ्या भावंडांना फार भारी वाटतं त्यांना. घरात लहान भावंडं असले की मोठ्या भावंडांना त्यांच्यावर मोठेपणा गाजवायला मिळतो. भावंडांमध्ये मोठे असण्याचा हा जसा फायदा आहे तशी मोठ्यांवर लहान भावंडांची जबाबदारी देखील असते. त्यांना सांभाळण्याची, गरज पडेल तेव्हा त्यांना मदत करण्याची, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मोठ्या भावंडांना नेहमी पार पाडावी लागते. यात ते कुठे कमी पडले तर त्याचा परिणाम म्हणजे आई बाबा लहान भावंडांना नंतर रागावतात, आधी आपल्याला त्यांच्या चुकीच्या वागण्याचा जाब विचारला जातो.

- लहान भावंडांच्या चुकीची शिक्षा मोठ्या भावंडांना करणं हे खरं तर जरा चुकीचं आहे. पण तुला गंमत माहितीये का, आपण सगळेच आपल्यापेक्षा मोठ्या माणसांकडे बघून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. म्हणजे मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतो. लहान भावंडं मोठ्या दादाकडे किंवा ताईकडे बघून त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्याला छोटी बहिण किंवा भाऊ असेल तर आपली जबाबदारी वाढते. तो किंवा ती आपल्याला बघून शिकणार आहे हे लक्षात ठेवायला लागतं. ते लक्षात ठेवलं की मग आपणही एखादी गोष्ट करताना नीट विचार करतो. आपोआप शहाण्यासारखे वागतो.

- तुझी लहान बहिण किंवा भाऊ एखादी चुकीची गोष्ट नेमकी तुझ्यासारखी करतात का? नीट आठवून बघ. कदाचित आईबाबा किंवा आजीआजोबांच्या अशी एखादी गोष्ट लक्षात आली असेल म्हणून ते तुला ओरडले असतील. किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुला ओरडल्यानंतर तुझं लहान भावंडं आपोआप ती गोष्ट करणं बंद करेल म्हणूनही तुला ओरडले असतील. त्यांनी तुला ओरडायला नको हे तुला वाटणं साहजिक आहे, पण त्यांनी तसं का केलं हे तू कधीतरी त्यांना त्यांचा राग शांत झाल्यावर विचारलंस तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact