आपल्या मेंदूला कार्टून्स पाहायला का आवडतात?

Image: freepik

मेंदू जेव्हा स्क्रीनवर कार्टून बघत असतो तेव्हा सुरुवातीला अतिशय छान वाटत असतं. खूप मज्जा येत असते. आपल्यासोबत ते बघायला जर मित्रमंडळी असतील, तर तोच आनंद पुन्हा घ्यावासा वाटतो.
आपण कार्टून बघत असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कार्टूनला एक गोष्ट असते. ‘मी तुला एक गोष्ट सांगू का ? असं म्हटलं की कोणाचेही कान टवकारतात. मुळात आपल्या सर्वांना गोष्ट हा प्रकार खूप आवडतो. याबरोबर एक फार आकर्षक संगीत असतं. त्या कार्टूनमधली इतर पात्र आपल्याला आवडत असतात. त्या कार्टूनची गोष्ट, पात्रांच्या संवादाला वेग असतो. त्याच्यामध्ये गंमत, राग, मज्जा, आनंद, आश्चर्य अशा वेगवेगळ्या भावना खचून भरलेल्या असतात. यामुळे आपल्या मेंदूच्या डाव्या - उजव्या गोलार्धाला चालना मिळत असते. मेंदूच्या डाव्या भागामध्ये भाषेचे काम चालतं आणि उजव्या भागामध्ये रंग, सर्जनशीलता, भावना याची केंद्र असतात. भाषेला ही सगळी केंद्र जोडली जातात ती कार्टूनमुळे! त्यामुळे आपल्याला खूप जास्त मज्जा येते.

कार्टून बघताना वेळ कसा जातो हेच कळत नाही. ते बघत बसण्यात खूप वेळ जातो. खूप वेळ तेच पाहात बसलं की मात्र मेंदूला कंटाळा येतो. कारण आता त्या कार्टूनमध्ये नाविन्यपूर्ण असं काही फारसं उरलेलं नसतं. दुसरं कारण आहे की ज्या वेळेला मेंदू एखादं काम करत असतो, तेव्हा आपला मेंदू ऍक्टिव्ह असतो. नुसतंच कार्टून बघत बसायचे, मेंदूला आपण काही काम देत नाही. फक्त समोर जे चालू आहे ते बघण्याचं काम एवढेच देतो. त्यामुळे बराच काळ गेल्यानंतर मात्र मेंदू कंटाळतो. अशावेळी लगेच स्क्रीन बाजूला ठेवणं आवश्यक.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact