“आमचा पतंग आभाळात गेला तर आम्ही पेच खेळू… आणि त्यात आम्ही हरू…” रिया म्हणाली.
“त्याची काळजी तुम्ही करू नका.” कबुतर म्हणालं, “तुम्ही जर नायलॉन मांजा वापरणार नाही असं प्रॉमिस केलंत तर तुमचा पतंग आभाळात जाईल आणि तुम्ही पेच जिंकाल!”
“कसं काय?”
“ते आमच्यावर सोडा…”
रिया आणि अयानने एकमेकांकडे बघितलं आणि म्हणाले, “मग आम्ही तसं प्रॉमिस करतो. कारण आमच्या मांज्यामुळे पक्ष्यांना लागलेलं आम्हाला आवडणार नाही.”
मग रिया म्हणाली, “पण ते सगळं नंतर… आधी तुला औषध लावलं पाहिजे.”
“आणि मग घरी पोचवलं पाहिजे.”
“घरी तर जायचंच आहे मला.” कबुतर दुःखी आवाजात म्हणालं, “माझ्या पिल्लांना भूक लागून गेली असेल, पण आता मी घरी कसा जाणार? मला तर हा पंख हलवता सुद्धा येत नाहीये.”
“आम्ही तुला घरी नेऊन सोडू. पण आधी औषध…” असं म्हणून रिया पळत पळत खाली गेली. त्यांच्या बिल्डिंगमधला एरिक नावाचा दादा पक्षीमित्र होता. रियाने त्याला बोलावून आणलं. त्याने कबुतराकडे बघितलं, परत खाली गेला आणि कबुतराला ड्रेसिंग करायचं सगळं साहित्य घेऊन आला. त्याने ओल्या कपड्याने कबुतराची जखम पुसली, त्याला मलम लावलं, तो एक पंख त्याने हलक्या हाताने कबुतराच्या शरीराला बांधून टाकला आणि कबुतराला म्हणाला,
“आता चार दिवस हा पंख हलवू नकोस अजिबात. म्हणजे तुला एकदम बरं वाटेल. आणि बरं वाटलं, की हे एक टोक फक्त ओढ, म्हणजे हे बँडेज सगळं निघून येईल.” आणि अयान आणि रियाला म्हणाला, “आता याला त्याच्या घरापर्यंत सोडायला पाहिजे.”
त्यावर ते दोघं एका आवाजात म्हणाले, “आम्ही पण येणार त्याला सोडायला…” आणि त्या दोघांनी पण घरी सांगून पायात बूट घातले, एरिकदादाने कबुतराला एका मऊ पांघरुणात ठेऊन अलगद एका टोपलीत ठेवलं, कबुतराने त्यांना घराचा पत्ता समजावून सांगितला. ते त्यांच्या जवळच्याच एका बिल्डिंगमध्ये रहायचं. आणि सगळी तयारी करून ते तिघं जण त्याला सोडायला त्याच्या घरापाशी जायला निघणार एवढ्यात रिया म्हणाली,
“एक मिनिट थांबा! मी आलेच.” एरिकदादा म्हणाला,
“अगं रिया थांब, कुठे चाललीस?”
पण छे! त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून रिया धावत धावत जिना चढून निघून गेली.
५ मिनिटात रिया धापा टाकत पळत आली तेव्हा तिच्या हातात एक वॉटरबॅग, पाण्याचा बाऊल आणि एका छोट्याश्या पुरचुंडीत तांदुळाचे दाणे होते. ती एरिकदादाला म्हणाली,
“अरे त्याची छोटी पिल्लं आहेत घरी. त्याच्या चोचीतले दाणे तर सगळे सांडून गेले. आणि त्याला आता चार दिवस उडता येणार नाही ना, म्हणून त्यांना खायला दाणे आणि प्यायला पाणी आणलंय.”
“मग एरिकदादाने तिला शाब्बासकी दिली. कबुतर तिला थँक यू म्हंटलं आणि ते तिघं मिळून कबुतराला त्याच्या त्याच्या घरी सोडायला गेले. कबुतराला बघितल्यावर त्याची पिल्लं खूष झाली. ती खरंच त्याची वाट बघत बसलेली होती. कबुतराने त्यांना तांदुळाचे दाणे भरवले. मग एरिकदादा, अयान आणि रिया घरी परत आले. आता पतंग उडवायचा मूड कोणाचाच नव्हता. आणि कोणाचा मूड असला जरी, तरी पक्षी काही कोणाला पतंग उडवू देत नव्हते. त्यामुळे तो संक्रांतीचा दिवस तसाच गेला.

पण त्यामुळे केदार-सूरज आणि अयान-रिया यांच्यातलं भांडण कसं मिटणार? त्यानंतरच्या पहिल्या रविवारी सगळे जण आपापले पतंग आणि चक्रया घेऊन गच्चीवर पतंग उडवायला हजर झाले. पण आता झालं असं, केदार आणि सूरजचा पतंग तर उडाला, पण रिया आणि अयानचा पतंग काही केल्या उडेना. कारण त्या दिवशी संक्रांतीसारखं वारं नव्हतं, आणि त्या दोघांना तितकासा चांगला पतंग उडवता यायचा नाही. केदार आणि सूरज एक्स्पर्ट होते, त्यामुळे त्यांनी कसाबसा पतंग उडवला आणि रिया आणि अयानला चिडवायला सुरुवात केली. त्या दोघांना रडू यायला लागलं.
अयानने कितीही उंच उडी मारून पतंग सोडला तरी तो सारखा नाकावर खाली आपटत होता. शेवटी त्याने एक शेवटचा प्रयत्न केला, त्याचा पतंग तीन फूट उंच उडाला आणि परत खाली येणार एवढ्यात कुठूनतरी एक कबुतर आलं, त्याने अलगद चोचीत पतंग पकडला आणि उडत उडत त्याला उंच घेऊन गेलं. एकदा वरच्या हवेला लागल्यावर पतंग मस्त उडायला लागला. अयानने चक्री धरली. कबुतर अलगद रियाच्या खांद्यावर येऊन बसलं, आणि म्हणालं, “तू हरायला लागलीस तर सांग. माझा मित्र पोपट समोरच्या झाडावर बसलाय, तो येऊन त्यांचा पतंग तोडून टाकेल. खेळ तू बिनधास्त!”
त्यानंतर रिया आणि अयान कधीच कोणाशी पेच हरले नाही…


