फिरायला घेऊन जा म्हटल्यावर आई बाबा अभ्यासाला का बसवतात?

Image: freepik

आईबाबा आम्हाला बाहेर फिरायलासुध्दा घेऊन जात नाही, सारखा अभ्यास कर म्हणतात. आई बाबा असं का करतात?

- समृध्दी काळे, श्री सरस्वती भुवन प्राथमिक शाळा, औरंगपुरा

- आईबाबा तुला सारखा अभ्यास कर असं म्हणतात कारण तू शाळेच्या अभ्यासात मागे पडू नयेस असं त्यांना वाटतं. पण सारखा अभ्यास करुन कंटाळा येत असेल हे मान्य. या कंटाळ्यावर उपाय म्हणून थोडावेळ फिरायला जाणं, खेळायला जाणं खरंच गरजेचं आहे. आई बाबांनी आपल्याला फिरायला न्यायला हवं. बाहेर जाऊन आई बाबांसोबत मजा करता यावी असं वाटणंही ही बरोबरच आहे. कदाचित असंच तुझ्या आई बाबांना देखील वाटत असावं. तुला फिरायला नेऊन खूष करण्याची त्यांचीही इच्छा असेल . पण कदाचित आईबाबांना कामामुळे तेवढा वेळ मिळत नसेल म्हणून इच्छा असूनही ते तुला फिरायला नेऊ शकत नसतील.
- आई बाबांसोबत बाहेर फिरायला मिळत नाही म्हणून वाईट वाटत असेल. पण सतत तोच विचार करत राहू नकोस. त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही तुला सहज शोधता येतील. सतत अभ्यास करुन कंटाळा आला की तू शेजारच्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळू शकतेस. किंवा गोष्टीची पुस्तकं वाचू शकतेस. चित्र काढू शकतेस. सायकल चालवू शकतेस.

- तुला एखादा छंद आहे का? असेल तर त्यात तू मन रमवू शकतेस. तुला झाडं लावायला आवडतात का? ते आवडत असेल तर तू तुझ्या घराच्या गॅलरीत किंवा अंगणात झाडं लावू शकतेस. झाडांना पाणी घालणे, त्यांची काळजी घेणे, झाडं मोठी होताना पाहणे ही गोष्टही खूप आनंद देणारी आहे. झाडांच्या सान्निध्यात तुला सततच्या अभ्यासाने किंवा त्याच त्याच रुटिनमुळे आलेला कंटाळा दूर होऊ शकतो.

- आईबाबांना सुट्टी कधी असते? त्यांना रविवारी सुट्टी असेल तर सोमवार ते शनिवार तू मन लावून अभ्यास केलास तर ते रविवारी तुला नक्की फिरायला नेतील. त्यांच्या इच्छेप्रमाणे तू छान अभ्यास केल्यानंतर एखाद दिवस ‘मला कंटाळा येतो. मला कधी तरी फिरायला न्या!’ असं तू त्यांना सांगितलंस तरी ते तुझं नक्की ऐकतील.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact