माझ्या सुटीचा आई-बाबांना वैताग का येतो? ते टेन्शन का घेतात?

Image: freepik

आता माझी शाळा संपणार आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु होणार, मग महिनाभर मस्त मज्जा, दंगा, धम्माल म्हणून मी परवा आनंदाने ओरडत होतो, तर आईबाबा म्हणाले, बापरे, आत्ताच आमच्या पोटात गोळा आलाय तुझी सुट्टी सुरु होणार आहे तर… माझा ना मूडच गेला एकदम, मला सुट्टी आहे यात आईबाबांना वैताग येण्यासारखं काय आहे?

अमूल्य कासार, धुळे

- तुझं बरोबर आहे, महिनाभर सुट्टी आहे तर रोज लवकर उठायला नको, शाळेत जायला नको, अभ्यास करायला नको म्हटल्यावर तू खुश असणार… तू आनंदात असताना आईबाबांनी बापरे, पोटात गोळा आलाय, असं म्हणायला नको होतं. पण काय होतं माहितीये का? आईबाबा ऑफिसला जातात… किंवा कधी तरी वर्क फ्रॉम होम करतात. तुला सुट्टी आहे म्हणून ते महिनाभर त्यांचं काम सोडून सुट्टी घेऊन घरी बसू शकत नाहीत. बरोबर ना? मग तू घरी आणि ते ऑफिसला असं झाल्यावर तू घरी नीट असशील ना? उन्हातान्हात बाहेर फिरे नसशील ना? नीट खाशीलपिशील ना? खेळायला गेल्यावर मित्रमैत्रिणींशी भांडणार नाहीस ना? किंवा आजीआजोबांना त्रास देणार नाहीस ना? कुठे धडपडणार नाहीस ना? धडपडलास तर तुला कोण बघेल? असे सतराशे साठ प्रश्न किंवा शंका आईबाबांच्या डोक्यात असतात. त्यांना तुझी काळजीही असतेच.

तू धडपडलास किंवा उन्हात खेळून आजारी पडलास तर त्यांना सुट्टी मिळेलच याचीही गॅरेंटी नसते ना? म्हणून तुला एवढ्या दिवसांची सुट्टी आहे म्हटल्यावर त्यांना थोडं टेन्शन येणं चुकीचं आहे का? तूच विचार कर आणि सांग बरं… त्यामुळे तू एक काम कर, आईबाबांना म्हणावं माझ्या सुट्टीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आता मोठा झालोय. मी छान शहाण्यासारखं वागेन, उन्हात खेळणार नाही. खेळताना धडपडून तुम्हाला टेन्शन देणार नाही. घरी आईबाबांना थोडीशी मदत करायचा प्लॅनही तू करु शकतोस, मग त्यांचं टेन्शन कमी होईल आणि तुझी सुट्टी तुम्ही सगळे मिळून एंजॉय कराल! काय वाटतं? कसाय प्लॅन?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact