डाॅ. श्रुती पानसे

image: cart91
भाषेचा अभ्यास कसा करायचा हे कळतंच नाही? भाषा विषयात कमी मार्कं पडतात, त्यामुळे एकूण मार्कांवर परिणाम होतो. भाषा विषयात मार्कं कमीच पडतात का? - - मानसी तांबोळी
हेही वाचा!
भाषेच्या पुस्तकाचा अभ्यास आणि इतर विषयांचा अभ्यास यात काय फरक असतो, हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? इतर विषयांमध्ये अनेकदा काही गोष्टी समजत नाहीत, गुंतागुंतीच्या असतात. पण भाषेच्या पुस्तकात समजत नाही, असं फारसं होत नाही. विशेषत: मराठीच्या पुस्तकात तर नक्कीच नाही. भाषेच्या पुस्तकाचा अभ्यास करताना अवघड काय जातं? असा प्रश्न मी काही मुलांना विचारला, तेव्हा ती सगळी मुलं काय म्हणाली माहिती आहे? सगळ्यात अवघड असतात ते शब्द. काही काही शब्द असे असतात की, त्यांचा अर्थच कळत नाही. मग काय ते शब्द आणि त्यांचा अर्थ पाठ करायचे की काय?
शब्दांचे अर्थ लिहा!
भाषेच्या पुस्तकातले शब्द आणि अर्थ पाठ करायची गरज नसते. या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत आहे. ते म्हणजे अर्थ लिहिणं. समजा एखाद्या परिच्छेदात सात-आठ शब्द अवघड असतील, तर त्यांचे अर्थ तिथेच पेन्सिलने लिहून ठेवायचे आणि मगच तो परिच्छेद वाचायचा. एकदा तुम्हाला अनोळखी शब्द वेचून वेचून त्यांचे अर्थ लिहून काढण्याचा कार्यक्रम पार पाडावा लागेल. त्यासाठी कदाचित वेळही जास्त लागेल. पण हे एकदाच करायचं आहे. ज्यादिवशी हे कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी धडा वाचायचा. वाचताना पेन्सिलने लिहिलेले अर्थ पण वाचायला विसरायचं नाही. म्हणजे संपूर्ण धड्याचा अर्थ एकदा नीट लक्षात येईल. एवढं केलंत की आपण टेकडीच्या मध्यावर आलोय, असं समजा. आता थोडंच उरलं. खरा अवघड भाग तुम्ही याआधीच करून टाकला आहे.

Image: intelligentliving
धडा वाचा पाच वेळा!
धडा पुन्हा पुन्हा वाचायचा. या धड्याचं जितकं जास्त वेळा वाचन कराल, तेवढा धडा जास्त पक्का होईल. इथे तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. धडा वाचताना आपोआप तुमचा व्याकरणाचाही अभ्यास होतो. तो वेगळा करायची फार गरज नाही. तो थोडासाच करावा लागतो. वाक्यरचना कशा करायच्या असतात, यांचाही अभ्यास यातूनच होणार आहे. कर्ता - कर्म - क्रियापद कशी कोणती कुठे वापरली जातात, हे यातच असतं. इंग्रजीची स्पेलिंग्ज वेगळी पाठ वगैरे करायची गरज नाही. म्हणजेच पुस्तक अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा वाचलं की अभ्यास होणारच. मात्र एक आहे, किमान पाच वेळा तरी प्रत्येक धडा वाचला जाईल, याची काळजी तुम्ही घ्याल ना? ते केलं की लेखन सोपं जाणार. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत अशा कोणत्याही भाषेचा अभ्यास करण्याची हीच पद्धत.
अनेकजण भाषेचा अभ्यास काय करायचा, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यात काय अभ्यास करायचा, असं त्यांना वाटतं. त्यामुळे भाषेत कमी मार्क मिळतात. कंटाळा न करता एवढ्या दोन पायऱ्या केल्यात की ती भाषा नक्कीच तुमच्या आवाक्यात येईल आणि परीक्षेत मार्कंही चांगले पडतील
लेखिका 'अक्रोड' उपक्रमाच्या संचालक आहेत.
shruti.akrodcourses@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact