अभ्यासासोबत कलाही जोपासायची,ते कसं शक्य आहे? त्याचा फायदा काय?

Image: freepik

शाळेचा अभ्यास इतका असतो मग एखादी कला जोपासायला मला वेळ कसा मिळणार.त्याचा फायदा काय?

- उदयन मुळे, इयत्ता ५ वी, ए.आर. एन मोटेगांवकर स्कूल, लातूर

- अभ्यासाच्या बरोबरीने एखादी कला जरुर जोपासावी. त्याचा फायदा होतो का असं तू विचारलं आहेस, फायदा होईल की नाही ते आत्ताच सांगता येणं अवघड आहे, पण उपयोग मात्र नक्की होतो. सतत अभ्यास करुन अनेकदा आपल्याला कंटाळा येतो. कंटाळा आल्यावर आता काय करु असं तू घरी आईबाबांना विचारत असशील. त्यावेळी तू तुझ्या आवडीची एखादी कला जोपासू शकतोस. रिकामा वेळ उत्तमरित्या घालवण्यासाठी कलेची आवड जोपासणं हा चांगला पर्याय आहे.

- तुला तबला वाजवायला आवडत असेल किंवा चित्रं काढायला आवडत असतील किंवा गाणं गायला, नृत्य करायला आवडत असेल किंवा फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस सारखे खेळ खेळायला आवडत असतील तर तू ती कला आणि खेळ वाढवण्यासाठी, जोपासण्यासाठी, थोडा वेळ काढ. त्यामुळे तुला वेगळं काही तरी शिकण्याचा, करण्याचा आनंदही मिळेल. कला किंवा खेळ शिकण्यासाठी वेळ दिल्याने मनावरचा ताण निघून जातो. अभ्यास आणि रोजचा दिनक्रम पाळताना कंटाळा येतो. दमायला होतं. काय नुसतं तेच तेच, किती अभ्यास करावा अशी चिडचिड होते. पण तेच आपण रोज थोडा वेळ एखाद्या कलेमध्ये रमलो, उत्साहाने खेळ शिकलो तर मन उत्साही होतं. ताण निघून जातो. कंटाळवाणा वाटणारा अभ्यास करायलाही मजा वाटते. म्हणून एखादी कला जोपास असं आई बाबा सांगत असतील. तू एखाद्या कलेत रस घेतलास, त्यात मन रमवलंस तर ताज्या दमाने अभ्यास करण्यासाठी तुला एकदम फ्रेश वाटेल याचा अनुभव नक्की येईल.

- तुझ्या आवडत्या कलेचं शिक्षण घेतलंस तर कदाचित मोठं झाल्यावर त्यातच तुला करिअर करता येईल. पैसेही मिळतील. कुणी सांगावं? पण त्याचा विचार आत्ता करु नकोस. चित्र काढण्याचा, तबला वाजवण्याचा, फुटबॉल खेळण्याचा किंवा तुझ्या आवडीची कुठलीही कला जोपासण्याचा आनंद तुला अनुभवता यावा म्हणून ती जोपास. तुला छानच वाटेल!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact