
“माझा लहान भाऊ मला बोचकारतो, पण मी त्याला नुसती चापटी मारली तरी मोठी माणसं मलाच रागवतात.”
“माझ्या धाकट्या बहिणीने मला धपाटा घातला. तीपण काही फार लहान नाहीये. तरीपण मम्मीपप्पा म्हणतात की ‘ती लहान आहे. तिला काही कळत नाही.’ असं कसं कळत नाही?”
“माझ्या काकांचा मुलगा आला की नुसता मला त्रास देतो तरीपण काका काकू म्हणतात की त्याला थोडा वेळ खेळव.”
सगळ्या मोठ्या ताईदादांनी हे सगळं कधी ना कधी ऐकलेलंच असतं. त्यांच्या लहान भावांनी किंवा बहिणींनी त्यांना त्रास दिलेला असतो आणि घरातल्या मोठ्या माणसांनी लहान मुलांची बाजू घेतलेली असते. असं जर का सारखं सारखं व्हायला लागलं तर ताईदादा लोक छोट्यांवर चिडणारच ना! पण मग घरातले काय म्हणतात, “तो लहान आहे म्हणून असं करतो. तू लहान आहेस का?” आणि मग मोठ्यांना अजूनच असं वाटायला लागतं की आपलं कोणीच ऐकून घेत नाही. आणि सगळे फक्त लहानांचीच बाजू घेतात. पण तसं खरंच असतं का?
तर मम्मीपप्पा जे म्हणतात, की “तो लहान आहे, त्याला अजून कळत नाही.” ही गोष्ट बहुतेक वेळा बरोबर असते. लहान मुलांना, अगदी ५ किंवा ६ वर्षांपर्यंतच्या मुलांनासुद्धा काही गोष्टी कळत नाहीत. त्यातसुद्धा मोठे ताईदादा जे करतील ते सगळं त्यांना करायचं असतं. ते त्यांना जमत नाही. मग ते चिडतात आणि सगळा राग ताईदादांवर काढतात. हे ते मुद्दाम करतात का? तर नाही. पण म्हणून मोठ्यांनी त्यांचं दर वेळी ऐकून घ्यायचं का? तर तेही नाही. कारण लहान मुलांना हे समजत नाही की ते जे करतायत ते चुकीचं आहे. पण मग ते त्यांना कोणीतरी सांगितल्याशिवाय कसं बरं समजेल?
हेही वाचा…
मोठी माणसं कधीच चुकू शकत नाहीत का?

त्यामुळे लहान भावंडांनी त्रास दिला, तर त्यांना थांबवायचं आणि समजावून सांगायचं. पण मारायचं नाही. मारायचं नाही हे फार अवघड आहे. कारण आपणपण त्यांना एक सणसणीत ठेऊन द्यावी असं कोणालाही वाटेल. पण कोणीच कोणाला मारायचं नसतं हे त्यांना शिकवण्यासाठी आधी आपण त्यांच्याशी न मारता बोललं पाहिजे. पण मग करायचं काय? तर त्यांना अट घालायची, की मारलंस, बोचकारलंस तर तुला खेळायला घेणार नाही. लहान भावंडांना हे पटकन समजतं.
खरं म्हणजे हे घरातल्या मोठ्यांनीही केलं पाहिजे. पण तसं त्यांना सांगणार कसं? त्यामुळे तुम्ही असं वागायला सुरुवात करा. तुमचं बघून मोठेही शिकतील आणि धाकटेही!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


