आपली सावली नेहमी सारखीच का दिसत नाही? ती वेगवेगळी का दिसते?

image : freepik

लख्ख उन्हात पडलेली तुमची सावली तुम्ही कधी निरखून पहिलीत का? पायाची सावली आणि डोक्याची सावली यात कोणता फरक दिसतो का? पायाच्या सावलीची कड डोक्याच्या सावलीच्या कडेपेक्षा रेखीव दिसते. याचं कारण काय असावं? ट्यूबलाईटच्या उजेडामुळे पडलेली तुमची सावली कशी पडते? फिसकटल्यासारखी दिसते. कारण टयूबलाईट हा प्रकाशाचा विस्तारीत स्रोत आहे.  आपल्याला आपली सावली अगदी स्पष्ट आणि रेखीव हवी असेल तर काय करायचे? एक युक्ती आहे. 

image : quora

एक आरसा घ्या. सपाट नाही.  बहिर्गोल आरसा. तो घराबाहेर उन्हात ठेवा. त्याच्यावरून परावर्तीत होणारा प्रकाश एखाद्या अंधाऱ्या खोलीतून आत भिंतीवर पडू द्या. खोलीत जा. हा प्रकाश पहा. जरा कमी प्रखर दिसतो का? या प्रकाशात तुमचा हात धरा. पहा हातावरच्या बारीक लवेची सावलीसुद्धा अगदी रेखीव दिसेल. पापणीच्या केसाची सावलीसुद्धा रेखीव दिसेल.  याचा उपयोग करून तुम्हाला कसल्या कसल्या आकृत्या छान काढता येतील? मुळात बहिर्गोल आरशामुळे इतकी काटेकोर सावली का पडत असेल? सूर्य हा प्रकाशाचा विस्तारीत स्रोत आहे तो बहिर्गोल आरशावरून परावर्तीत होताना बिंदुरुप होतो. त्यामुळे स्रोत जेवढा लहान तेवढी सावलीची कड धारदार दिसते.

. - मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग