रोजचं वर्तमानपत्र वाचायलाच हवं असा काही नियम आहे का?

Image: manavsthaliglobalschool

मला पेपर वाचायचा कंटाळा येतो पण आई बाबा सारखा पेपर वाच असं म्हणतात. असं का? -
अंश चुडीवाल, फ्रांसेलियन स्कूल ऑफ एक्सेलन्स

- आईबाबा सारखा पेपर वाचायचा आग्रह करतात कारण पेपरमधल्या बातम्यांमुळे तुझं सामान्य ज्ञान वाढायला मदत होते.

- शाळेचा अभ्यास तर तू चांगला करत असशीलच. परीक्षेत तुझा नंबरही येत असेल. पण त्यापलिकडे जाऊन आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे तुला माहिती नसेल तर तुझं नुकसान होईल.

- पेपरमध्ये रोजच्या रोज क्रिकेट, फुटबॉल, सिनेमा, राजकारण, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काय काय घडतंय याची माहिती असते. नवीन पुस्तकं, नवनवीन शोध याबद्दलच्या बातम्याही असतात. नियमित पेपर वाचनाने आपल्याला जगात कुठे काय सुरु आहे हे समजतं.

- आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं. या परीक्षांमध्ये चालू घडामोडींवरही प्रश्न विचारले जातात. या घडामोडी आपल्याला पेपर वाचल्याशिवाय कळू शकत नाही. शिवाय पेपर वाचल्याने अनेक विषयांची खोलातून माहिती मिळते.

- वर्तमानपत्रात वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आणि बातम्या असतात. आपल्याला सर्व क्षेत्राची ओळख होण्यासाठी पेपर वाचणं आवश्यक आहे.

- नियमित पेपर वाचल्याने आपली भाषा देखील सुधारते. भाषेतले नवनवीन शब्द कळतात. एखादा विषय आपल्या शब्दात मांडण्यासही पेपर वाचनाची मदत होते. पेपर वाचनाने आपल्याकडील माहितीचा साठा वाढतो. वाचनामुळे लेखन करण्याची प्रेरणा मिळते.

- शनिवार रविवारी वर्तमानपत्रात मुलांच्या पानावर किती तरी गोष्टी, चित्रं, कोडी असतात. हे सगळं वाचलंस तर तुला किती तरी नवीन गोष्टी कळतील. अभ्यासाबरोबरच आजूबाजूच्या जगात काय चाललंय हे माहिती असलेल्या मुलांना स्मार्ट मुलं म्हटलं जातं. तू फक्त पुस्तकी किडा राहू नयेस आणि एक स्मार्ट मुलगा असावंस असं आईबाबांना वाटतं. म्हणून ते तुला पेपर वाच म्हणून मागे लागतात.

- रोज थोडा वेळ पेपर वाचायला सुरुवात केलीस तर तुलाही त्याची गोडी लागेल आणि तू स्वतःच आईबाबांच्या आधी रोजचा पेपर वाचून संपवशील!बघ तू!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact