
भूमितीची प्रमेयं किती बोअर असतात, ती पाठ करायचा काय उपयोग?-
जयदीप त्रिभुवन, इयत्ता ८ वी, जागृती हायस्कूल.
- भूमिती या विषयाची अनेकांना तो विषय शिकण्याच्या आधीच भीती वाटत असते. त्यामुळे हा विषय जेव्हा प्रत्यक्ष अभ्यासात येतो तेव्हा तो नकोसा वाटतो. तुझ्याबाबतीतही हे असंच झालं होतं का ?
- असं जर झालं असेल तर आधी भूमिती या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल. इतर विषयांसारखाच भूमिती हा देखील एक विषय आहे असं बघायला सुरुवात कर. यामुळे या विषयाची भीती, नावड ही कमी होईल.
- प्रमेयं बोअर असतात म्हणून ती पाठ केली नाही आणि परीक्षेत ती लिहिता आली नाहीत म्हणून तू नापास झालास तर चालेल का? नाही ना? मग तुला प्रमेय पाठ करायलाच हवीत.
-अर्थात पाठांतर हे फक्त परीक्षेत पास होण्यासाठी करायची गोष्ट आहे असं अजिबात नाही. उलट गणित, त्यातल्या क्रिया, सूत्र, प्रमेय यांच्या अभ्यासामुळे मेंदूचा विकास होतो. स्मरणशक्ती सुधारते. एकाग्रता वाढते. त्याचा उपयोग गणिताच्या अभ्यासाव्यतिरिक्तही होतोच. त्यामुळेच थोडंसं बोअर वाटत असलं तरी गणिताचा अभ्यास करायला हवा. प्रमेय पाठ करायला हवीत.
- शिवाय दहावीनंतर तुला विज्ञान शिकायचं असेल, डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असेल, डेटा सायंटिस्ट व्हायचं असेल तरी गणिताचा अभ्यास करायला हवाच. गणित, भूमिती आणि त्यातली उदाहरणं फक्त पुस्तकात आणि परीक्षेतच उपयोगी पडतात असं नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यातही त्यातले धडे कधी ना कधी कामी येतातच.
- प्रमेय सिध्द करण्यासाठी तार्किक उत्तरं देणं गरजेची असतात. आपल्याला त्यासाठी माहितीचं विश्लेषण करावं लागतं. पॅटर्न ओळखावे लागतात. तार्किक मुद्दे मांडवे लागतात. त्याचा फायदा म्हणजे आपलं तार्किक कौशल्य ( लाॅजिकल स्किल) विकसित होतं.
- भूमितीत विविध आकार, अवकाशीय जागेत त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध यांचा अभ्यास केल्याने आपल्याला अवकाशीय संकल्पना समजतात. आपण यामुळे आपल्या डोळ्यासमोर दृश्यं उभं करु शकतो. यालाच व्हिज्यअलायझेशन असं म्हणतात. आर्किटेक्चर क्षेत्रात या कौशल्याचा उपयोग होतो.
- प्रमेयांचा जर मन लावून अभ्यास केला तर समस्या सोडवण्याचं कौशल्य विकसित होतं.
- त्यामुळे कंटाळा आला तरी गणिताच्या, भूमितीच्या अभ्यासाला पर्याय नाही. तो अभ्यास कंटाळवाणा होऊ नये यासाठीचे मार्ग तू शोध. शक्य असल्यास त्यासाठी आईबाबांची किंवा तुझ्या गणिताच्या शिक्षकांची मदत घे.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


