हनीइटर्स पक्ष्यांना लावावा लागला गाणं शिकण्याचा क्लास!

Image: theguardian

जगभरात अनेक प्राणी, पक्ष्यांच्या प्रजाती आहेत ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत असतात. असेच प्रयत्न रीजेंट हनीइटर या पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी होत आहेत. आग्नेय ऑस्ट्रेलियातले हे स्थानिक पक्षी आहेत. पूर्वी या पक्ष्यांचे थवेच्या थवे असायचे. पण आता त्यांची संख्या कमालीची घटली आहे. कारण हे पक्षी जिथे राहतात ते जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट झालं आहे. आता राहायला घरच नाही म्हणून हे पक्षीही आता विखुरले गेले आहे. हनीइटर्सची संख्या इतकी कमी झाली आहे की हे पक्षी आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पण आता शास्त्रज्ञांनीच हनीइटर्सची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी ते अतिशय वेगळा प्रयोग राबवत आहे. हा प्रयोग आहे शिकवणीचा. क्लासचा. शास्त्रज्ञांनी लहान हनीइटर्स पक्ष्यांना मोठ्या हनीइटर्स पक्ष्यांचा क्लास लावला आहे. हे वाचून पक्ष्यांना कुठे क्लास लावतात काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण हे असं खरंच झालं आहे. आणि छोटे हनीइटर्स पक्षी मोठ्या पक्ष्यांकडून चांगले शिकले देखील.
आग्नेय ऑस्ट्रेलियातील जंगलातल्या हनीइटर्सची संख्या कमी झाली. आता फक्त २५० हनीइटर्सच शिल्लक राहिले आहेत. या पक्ष्यांची संख्या जसजशी कमी होत आहे तसे ते जास्त विखुरले जात आहेत. पण यामुळे एक वेगळीच समस्या निर्माण झाली. जंगलात विखुरल्या गेलेल्या लहान हनीइटर्सना मोठे हनीइटर्स जी गाणी म्हणतात ती म्हणताच येत नाही. लहान मोठे हनीइटर्स एकत्र राहायचे तेव्हा लहान हनीइटर्स मोठ्या हनीइटर्सकडून गाणं शिकायचे. पण जंगल तोडलं गेल्याने हनीइटर्स विखुरले गेले . लहान पक्ष्यांचं गाणी शिकण्याचं मग राहूनच गेलं.

हेही वाचा!

माणसांप्रमाणे रॅकून्सलाही कोडी सोडवायला आवडतात? हे प्राणी एवढे हुशार कसे?

Image: theguardian

गाणं म्हणता येणं ही गोष्ट हनीइटर्ससाठी महत्त्वाची गोष्ट असते. नर हनीइटर्स हे गाणं म्हणतात तेव्हा मादी पक्षी त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढण्यास मदत होते. गाणं म्हणूनच हनीइटर्स पक्षी आपल्या प्रदेशाचा/ भागाचा बचाव करतात. जंगलात विखुरले गेलेले काही हनीइटर्स गाणी म्हणतात. पण मोठे हनीइटर्स म्हणतात त्या गाण्यांची सोपी आवृत्ती ते म्हणतात. किंवा इतर पक्ष्यांचं गाणं ऐकून त्यांची नक्कल करतात. पण मोठ्या हनीइटर्सकडून शिकलेलंच नसल्याने या छोट्या हनीइटर्सना त्यांचं मूळ गाणं म्हणताच येत नाही.
हनीइटर्सना जर गाणं म्हणता आलं नाही तर ते त्यांच्या भागाचं रक्षण करता येणार नाही, त्यांची संख्या वाढणार नाही. हा धोका लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियातील झूमध्ये छोट्या हनीइटर्सना बंदिस्त जागेमध्ये वाढवले जात आहे. या पक्ष्यांना नंतर जंगलात सोडण्यत येणार आहे. पण या पक्ष्यांना मोठ्या हनीइटर्सची गाणी ऐकवल्याशिवाय गाणी म्हणताच येणार नाही हे शास्त्रज्ञांना लक्षात आलं. त्यामुळे या छोट्या हनीइटर्सना गाणी शिकवण्याची व्यवस्था शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यासाठी ट्यूटर नेमण्यात आले आहेत. हे ट्यूटर म्हणजे गाणी म्हणता येणारे हनीइटर्स.

 

सुरुवातीला शास्त्रज्ञांनी रेकाॅर्ड केलेली हनीइटर्सची गाणी लहान हनीइटर्सना दिवसभर ऐकवली. पण ते ऐकून छोटे पक्षी जे गाणं म्हणायचे ते चुकीचे होते. या झूमध्ये दोन मोठे जुने हनीइटर्स आहेत. या हनीइटर्सच्या सहय्यानेच झूमधील छोट्या हनीइटर्सना गाणी म्हणायला शिकवलं जात आहे. मोठे हनीइटर्स लहान पक्ष्यांना शिकवत आहे. या शिकवणीचा चांगला उपयोग झाला. तीन महिन्यानंतर या छोट्या पक्ष्यांनी अचूक गाणं म्हणण्यास सुरुवात केली. शिकवणाऱ्या हनीइटर्सकडे शिकणारे४-५ हनीइटर्स असतात तेव्हा ते चांगले शिकतात. हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. जंगलातील हनीइटर्सची संख्या वाढेपर्यंता शास्त्रज्ञ हा शिकवणीचा प्रकल्प सुरुच ठेवणार आहे.

Image: taronga

आता जे छोटे पक्षी व्यवस्थित गाणं शिकले त्या पक्ष्यांना लहान हनीइटर्सना गाणं शिकवण्यासाठी ट्यूटर म्हणून नेमण्यात येणार आहे. तर आणखी चांगल्या गाता येणाऱ्या पक्ष्यांना जंगलात सोडण्यात आलं आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधक या गाणं शिकणाऱ्या, गाणं शिकून जंगलात गेलेल्या हनीइटर्सवर लक्ष ठेवून आहेत. शास्त्रज्ञांना आशा आहे की गाणं येणाऱ्या हनीइटर्सची जंगलातली संख्या जशी वाढेल तशी या पक्ष्यांची जंगलातली संख्याही नक्की वाढेल. आता कळलं हनीइटर्ससाठी गाण्याचा क्लास का लावावा लागला ते!

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact