मुलींना सारखं रडू कसं येतं? मुलांसारख्या त्या धीट का नसतात ?

Image: freepik

मुलींना थोडं काही झालं तर रडायला येतं. मुलांना मात्र असं कधी रडायला येत नाही. आम्ही मित्र तर नेहमी यावर बोलतो. आम्हाला वाटतं मुली रडक्याच असतात. मुलांसारख्या मुली धीट का नसतात? - स्वप्नील काशिद, बीड

- मुली रडतात म्हणजे त्या धीट नसतात आणि मुलं रडत नाहीत म्हणजे ती धीट असतात असं तुला कुणी सांगितलं? मुलींना रडू आलं तर त्या मोकळेपणी रडतात आणि मुलांना रडू आलं तर ती आपलं रडणं दाबून ठेवतात किंवा छे, मला रडू आलंच नाही असं दाखवतात. बरोबर ना, खरं खरं सांग!

रडणं ही एखाद्या क्रियेवर आलेली आपली प्रतिक्रिया असते. आई ओरडली म्हणून रडू आलं किंवा शाळेत पहिला नंबर आला नाही म्हणून रडू आलं. पडल्यावर लागलं म्हणून रडू आलं, अशी किती तरी कारणं असतात रडू येण्यामागे, हो ना? मग मुलांनाही रडू आलं तर बिघडलं कुठे?

मुली रडतात तर त्या हळूबाई असतात आणि मुलांनी काहीही झालं तरी अजिबात रडायचं नाही हे आपल्याला मोठी माणसं उगाचंच सांगत असतात. पण काय बिघडलं मुलांनीही रडलं तर? तुला रॉजर फेडरर माहिती आहे ना? तो टेनिसमधून रिटायर्ड झाला तेव्हा टेनिस कोर्टवर त्याच्याबरोबर तगडी स्पर्धा करणारा नदाल आणि फेडरर किती रडले होते तू बघितलं होतंस का? आपला सचिन तेंडूलकर क्रिकेटमधून रिटायर्ड झाला तेव्हा शेवटचं भाषण करताना त्यालाही भरुन आलं होतं. मग नदाल, फेडरर आणि सचिन हे धीट नाहीत असं म्हणणार का तू? नाही ना?

मुलींना रडायला येतं आणि आम्हाला मात्र येत नाही असं तू म्हणतो आहेस खरा, पण खरंच जरा विचार कर बरं, रडू येतं आणि ते दाखवायचं नसतं का तुम्हा मुलांना? न रडणं तुम्हाला कूल वाटतं का? तर तसं ते वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. आपण अजिबात न हसणं जसं आपल्यासाठी चांगलं नसतं ना तसंच आपण न रडणंही आपल्यासाठी अजिबात चांगलं नसतं, आलं रडू तर रडून घ्यावं, त्यात काय? काय वाटतं तुला? पटलं का तुला हे? नक्की कळव.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact