आई-बाबा माझ्या परवानगीशिवाय माझ्या वस्तुंना हात का लावतात?

 Image: freepik

आज काढतो, उद्या काढतो म्हणत शाळा सुरु होण्याची वेळ जवळ आली, पण अबीरनं काही आपल्या कपाटातली जुन्या वह्या पुस्तकांची रद्दी काढलेली नव्हती. आईने बऱ्याचदा पुढाकार घेतला, पण ' तू नको आई, मी आवरतो माझी वह्या पुस्तकं.. तू घाई घाईत माझ्या वस्तू देशील टाकून!' असं म्हणत अबीरनं आईचा कपाट आवरण्याचा उत्साह घालवला. पण आईची वाट बघण्याची सीमा संपली. शाळा उघडायला आता दोनच दिवस शिल्लक होते. संध्याकाळी बाहेर जावून नववीची नवीन वह्या पुस्तकं आणायची होती. आईनं कपाट आवरण्याची अबीरला पुन्हा आठवण करुन दिली. 'आई आज चेसच्या क्लासवरुन आल्यावर नक्की आवरतो. प्राॅमिस ' म्हणत अबीर रविवारी सकाळी चेसच्या क्लासला निघून गेला.

आई पेपर वाचत होती. तितक्यात तिला ' पेपर रद्दीवाले... ए भंगारवाले..' असा आवाज ऐकू आला. आता हा पुढच्या रविवारीच येणार, रद्दीतर आजच द्यायला हवी. आई घाई घाईने उठली, खिडकी उघडून तिने भंगारवाल्या दादांना बोलावले. ते आल्यावर त्यांना दहा मिनिटं थांबायला सांगितलं. अबीरच्या खोलीत जावून तिने कपाट उघडलं. त्याची सर्व वह्या पुस्तकं बाहेर काढली.  एक एक पुस्तक तिने नीट चाळून पाहिलं. वह्या नीट पाहून घेतल्या. ' माझ्या आठवीच्या गणिताच्या वह्या मला लागणार आहेत' असं अबीर म्हणाला होता, हे आईला आठवलं. तिने गणिताच्या सर्व वह्या बाजूला ठेवल्या. वह्यांमधली कोरी पानं फटाफट काढून घेतली. सर्व रद्दी तिने रद्दीवाल्या दादांसमोर आणून ठेवली. सगळ्यांचे मिळून रद्दीवाल्या काकांनी आईला १२० रुपये दिले.

हेही वाचा!

रद्दीच्या पैशांवर अबीरचा हक्क असायचा, त्यामुळे आईने ते पैसे टेबलावर ठेवले आणि ती तिच्या कामाला लागली. क्लासवरुन अबीर आल्यावर आईने 'एकदाची रद्दी दिली बाबा आज' असं अबीरला खूशीत सांगितलं. ' पण आई मी आवरणार होतो ना आज... झालं गेल्या माझ्या गणिताच्या वह्या..' म्हणत अबीर ओरडला.

'अरे कशा जातील.. लक्षात होतं माझ्या.. ठेवल्या आहेत बाजूला काढून. एवढा आरडाओरडा करण्याची गरज नाहीये. टेबलावर ठेवलेले पैसे उचला आणि ठेवा आपल्या पिग्गी बॅंकेत. करायचं काही नाही आणि रुबाब पाहा यांचा..' असं आई वैतागानं पुटपुटली. रद्दीचे पैसे पाहून अबीर खूष झाला. त्यादिवशी संध्याकाळी अबीरचे नवीन वह्या पुस्तकं, स्टिकर्स, कव्हर्स सर्व घरात आले. आईने कितीतरी वेळा पुस्तकं उघडून त्यांचा वास घेतला. हे बघून अबीर हसत होता, आईची मजा उडवत होता.

दुसऱ्या दिवशी अबीर लवकर उठला. पटकन आंघोळ आटोपून खेळायला जाण्यासाठी तयार झाला. सुटीचा शेवटचा दिवस असल्याने दिवसभर क्रिकेट खेळण्याचं अबीरचं आणि त्याच्या मित्रांचं प्लॅनिंग होतं.

' आई माझे शूज कुठेय?' अबीरने ओरडतच आईला विचारले.

'अरे कुठे असणार, सकाळी झटकून बाहेर ठेवले आहेत बघ!' अबीरने दरवाजा उघडून बाहेर बघितलं. ' आई नाहीये माझे शूज बाहेर!'

हातातलं काम टाकून आई बाहेर आली. तिने दरवाजा उघडून बाहेर डोकावलं तर तिला शूज दिसले. तिने अबीरचा हात धरत त्याला दाराजवळ आणून शूज दाखवले. ' हे शूज नाहीतर काय आहे?'

' अगं हे नाही. माझे लाल शूज. पुमाचे. ते कुठेय?'

आईच्या डोक्यात ट्यूब पेटली. झाला गोंधळ आई मनातल्या मनात म्हणाली. काल रद्दीवाल्याला वह्या पुस्तकं आणि पेपरची रद्दी दिली. ' अजून काही आहे का बघा ना ताई' असं रद्दीवाले काका म्हणाले. आईने दोनदा नाही सांगितलं. ' जुने नळ, चपला -बूट काहीतरी असेल बघा ना अजून' यावर आईचं लक्ष उघड्या असलेल्या शू रॅककडे गेलं. त्यात तिला अबीरचे लाल रंगाचे बूट दिसले. दोन्ही बुटांना पुढे मोठी भोकं पडलेली. गेल्या सहा महिन्यात अबीरच्या पायात तिने ते एकदाही बघितलेले नव्हते. तिला वाटलं आता होत नसतील बहुतेक त्याला. तिने काहीही विचार न करता ते शूज रद्दीवाल्याला देवून टाकले. आईला सर्व लख्खं आठवत होतं. आणि इकडे अबीरचा आरडा ओरडा सुरु होता. ' कुठे आहे माझे शूज आई.. तूच ठेवले असशील कुठेतरी'

' अबीर तुझे शूज तुला माहिती, मला काय माहित?' आईने आधी अशी बचावात्मक भूमिका घेवून पाहिली. पण अबीरची खात्रीच होती. आई शिवाय कोणीच बूट इकडे तिकडे ठेवणार नाही. ' आई तूच ठेवले असतील शूज माझे.. की दिले फेकून?'

शेवटी आईने हिंमत करुन सांगितलं, ' अरे ते शूज ना.. ते तर फाटलेले होते. आणि तू कुठे वापरत होता? '

'आई ते मी बाबांसोबत जावून दुरुस्त करणार होतो. म्हणजे तू फेकले की काय ते बूट?' अबीरनं घाबरतच आईला विचारलं.

'फेकले नाही, काल रद्दीवाल्याला दिले!'

' बाबा अरे बघ ना आईने चार हजाराचे पुमाचे शूज रद्दीत दिले!'

हा सगळा गोंधळ ऐकून बाबाही बाहेर आले. आता अबीर चांगलाच चिडला होता. आईनेही सावध होवून स्वत:चा बचाव करायला सुरुवात केली होती. ' आई, तुझं हे नेहमीचंच आहे, नेहमी पसारा म्हणून तू माझ्या वस्तू फेकून देतेस.'

'आजपर्यंत एकही कामाची वस्तू फेकलेली नाही. काहीही आरोप लावू नकोस माझ्यावर अबीर!'

'आरोप कसले आई, माझे ऐवढे महागाचे ब्रॅण्डेड बूट तू रद्दीवाल्याला दिले, मला न विचारता.. का माझ्या वस्तूंना मला न विचारता हात लावतेस!'

'म्हणजे आम्हीच घेतलेल्या वस्तू, त्यालाही तुझी परवानगी घेवून हात लावायचा का?'

' तुम्ही घेवून दिले होते, पण ते माझे होते ना, तुझ्या वस्तुंना हात लावलेला तुला चालतो का? तुझा तो जुनाट कप मी फोडला, तर किती बोलली होती मला आणि तू तर माझे चांगले बूट रद्दीत दिलेस'

' चांगले नाही, फाटलेले बूट होते अबीर!'

' आई ते मी दुरुस्त करुन घेणार होतो'

Image: pixy

बाबाने पाहिलं, आपण जर मधे पडलो नाही तर हे भांंडणाचं गुऱ्हाळ कितीही वेळ असंच सुरु राहिलं असतं.

' अबीर जाऊ दे आता, गेले ते बूट'

' म्हणजे बाबा तू आईला काहीच बोलणार नाहीस, तिने माझं किती मोठं नुकसान केलं!'

' तुझ्या आईची ही जुनी सवय मला माहीत आहे, काय बोलणार?' बाबा हसू दाबत म्हणाले.

' बाबा तुझे बूट आईने असेच फेकून दिले असतेस तर तू असाच हसत बोलला असता का!'

अबीरला शांत करणं गरजेचं होतं, हे बाबांनी ओळखलं.

' मयूरी तुझं चुकलं . त्याच्या वस्तू रद्दीत देण्याआधी, फेकण्याआधी त्याला विचारायला हवं होतंस!'

' तो कुठे आवरत होता त्याचा पसारा?' आई चिडून म्हणाली.

' हे बघ त्याच्या वस्तू त्याची जबाबदारी. मग त्या वस्तू नवीन असू देत नाहीतर रद्दी, भंगार. तो बघेल त्याचं काय करायचं ते. आणि आपल्याला जसं आपल्या वस्तुंना आपल्या परवानगीशिवाय हात लावलेला , इकडे तिकडे ठेवलेल्या आवडत नाही, तसं अबीरलाही ते कसं आवडेल, थोडा विचार कर ना त्याच्या बाजूने!'

बाबांचं बोलणं ऐकून अबीरचा संताप कमी झाला होता. आईचा चढलेला पाराही खाली उतरला होता.

आईनं अबीरला जवळ घेतलं. ' माझं चुकलं रे बाळा. पुन्हा तुझ्या वस्तू अशा तुला न सांगता नाही टाकणार मी!'

अबीर जमिनीकडे पाहून मुसमुसत होता. डोळ्यात पाणी होतं त्याच्या. अबीरच्या डोळ्यातलं पाणी पाहून आईलाही गलबलून आलं. शेवटी बाबांनी दोघांनाही जवळ घेतलं.

मुलांचाही त्यांच्या वस्तूंवर अधिकार असतो. मोठ्यांनी त्यांना गृहित धरुन त्यांच्या वस्तू त्यांना न विचारता टाकून देणं हे चुकीचंच, हा मोठा धडा शूजच्या निमित्ताने आईला मिळाला होता.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact