आईबाबा त्यांच्या इच्छा मुलांवर का लादतात?

Image: freepik

आईबाबा त्यांच्या इच्छा माझ्यावर का लादतात? त्यांच्या इच्छा मी पूर्ण करायच्या हे बर्डन का? त्यांच्या इच्छा पूर्ण करत बसायचं असेल तर माझ्या इच्छांचं काय? - श्रुती

आईबाबा त्यांच्या इच्छा तुझ्यावर लादतात म्हणजे काय करतात? आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईबाबांसाठी आपण नेहमी लहानच असतो. त्यामुळे आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या काही इच्छा असू शकतात. एखाद्या वेळी त्यांना निर्णय घेता येऊ शकतो. त्यांना चांगलं वाईट कळू शकतं हे आईबाबांच्या लक्षात येत नाही. म्हणून मग आईबाबा त्यांना जे वाटतं ते आपल्याला सांगत राहातात, ते आपण ऐकतोय की नाही, करतोय की नाही याकडे लक्ष ठेवतात. केलं नाही, ऐकलं नाही की ओरडतात.

त्यांच्या या वागण्याकडे त्यांचं लादणं म्हणून न बघता त्यांची काळजी म्हणून बघितलंस तर गोष्टी सोप्या होतील. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बोलणं, संवाद, कम्युनिकेशन. आईबाबांनी एखादी गोष्ट ‘अशी कर!’ असं तुला सांगितलं तर ती गोष्ट अजून कशी करुन बघता येईल याच्या तुझ्या मनातल्या आयडिया तू आईबाबांशी शेअर करतेस का कधी? तू तसं केलंस की आपोआप आईबाबांच्या लक्षात येईल की तू एखाद्या गोष्टीवर विचार करते आहेस, नवीन काही ट्राय करुन बघणं तुला जमतं आणि आवडतं आहे, म्हणजे मग नवीन गोष्ट करताना आईबाबा तुझं मत काय आहे विचारतील, तुझी इच्छा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.

आईबाबांच्या इच्छा पूर्ण करणं हे बर्डन आहे असं मानू नकोस, त्याऐवजी ती इच्छा पूर्ण करणं तुला कठीण वाटत असेल तर ते तसं का वाटतंय हे त्यांच्या लक्षात आणून दे. तुझी वेगळी काय इच्छा आहे, ती तशी का आहे हे ही त्यांना सांग, म्हणजे तुला त्यात बर्डन वाटणार नाही आणि तुझ्या इच्छा पूर्ण करायला आईबाबाही तुला मदत करतील.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact