
माझे केस कुरळे आहेत म्हणून मैत्रिणी मला मॅगी म्हणून चिडवतात. मला ते आवडत नाही, मी काय करु?
- एक विद्यार्थी
- दिसण्यावरुन नावं ठेवणं, मजा उडवणं हे काही फक्त तू अजून लहान आहेस म्हणून तुलाच अनुभवायला येतं असं नाही. सर्वच वयोगटातल्यांना या गोष्टीचा सामना करावा लागतो.
- समोरचा माणूस जाणून घेताना त्याचं/तिचं दिसणं ही इतकी महत्त्वाची गोष्ट नसते. त्या व्यक्तीचा स्वभाव, तिच्यात असलेले इतर गुण, त्या व्यक्तीचं बोलणं वागणं या गोष्टींना ती कशी दिसते/दिसतो यापेक्षा जास्त महत्त्व द्यायला हवे. पण अजूनही व्यक्ती दिसते कशी, तिच्या त्वचेचा रंग कसा, केस कसे, उंच आहे की ठेंगणा, जाड की बारीक या गोष्टींकडेच जास्त पाहिलं जातं. आणि दिसण्याच्या विशिष्ट चौकटीत ती व्यक्ती बसत नसेल तर त्या व्यक्तीला नावं ठेवणं, हसणं, मजा उडवणं या गोष्टी सुरु होतात.
- कुणी आपल्याला चिडवतं आणि आपल्याला ते आवडत नाही तेव्हा त्या चिडवण्याकडे दुर्लक्ष करणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे.
- तुला दुर्लक्ष करता येत नसेल आणि चिडवतात म्हणून मैत्रिणींचा राग येत असेल तर तू त्यांना तसं स्पष्ट सांगू शकतेस.
- आपले केस कुरळे असतात की सरळ असतात, आपल्या त्वचेचा रंग गोरा असतो, काळा असतो की सावळा असतो, आपण उंच असतो की बुटके, बारीक असतो की जाड यातलं काहीही आपल्या हातात नसतं. या गोष्टी आपल्या जनुकांमधून आपल्याला मिळतात. तू थोडी मोठी झालीस की विज्ञानाच्या पुस्तकातून तुला त्याबद्दल जास्त कळेल. तू मैत्रिणींशी बोलणार असशील तर हे त्यांच्या नक्की लक्षात आणून दे.
- आपण कसे दिसतो, असतो हे आपल्या हातात नसल्यामुळे कुणी आपल्याला चिडवत असेल तर ते मनाला लावून घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कुणी चिडवलं की आवडत नाही तर आपणही कुणाला चिडवायचं नाही हे तू नक्की लक्षात ठेव. तू कुणालाही कधीही चिडवत नाहीस हे लक्षात आल्यानंतर तुझ्या मैत्रिणी आवर्जून लक्षात ठेवतील आणि तुझं अनुकरण करतील.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


