पावसाळ्यातल्या चार महिन्यानंतर पाऊस का नाही पडत?

- निरंजन घाटे

अनेक देशात वर्षभर पाऊस पडतो. भारतासारखे काही मोजके देश असे आहेत जेथे विशिष्ट महिन्यातच पाऊस पडतो. त्या विशिष्ट कालावधीनंतर पडणारा पाऊस अवकाळी पाऊस म्हणून ओळखला जातो. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होतं. आपल्याकडे जून ते सप्टेंबर हा पाऊस पडण्याचा कालवधी असतो. पण बरेचदा एप्रिल-मे महिन्यात पाऊस पडतो, त्याला आपण 'वळवाचा पाऊस' म्हणतो. जगातला काही विशिष्ट भाग सोडला तर इतर भागातल्या देशांमध्ये पावसाळा नसतो. तिथे वर्षभर पाऊस पडतो. अगदी उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या देशांमध्ये उन्हाळ्यात आपण पाहतो तसा पाणीरूपातला पाऊस पडतो, तर हिवाळ्यात तो हिम म्हणजे बर्फ़ाच्या रूपात पडतो . विषुववृत्तीय प्रदेशात तो वर्षभर पडत राहतो .

साधारणपणे वर्षातले ७० ते ८० दिवस रोज संध्याकाळी पावसाची सर येते. भारत आणि भारताच्या पूर्वेकडचे देश तसंच आफ्रिकेचा काही भाग आणि द. अमेरिकेचा थोडा भाग यात मात्र उन्हाळ्याच्या दुसऱ्या भागात म्हणजे आपल्याकडे जून ते सप्टेंबर या काळात पर्जन्यवृष्टी होते. भारतात काही भागात यानंतरच्या काळात पाऊस पडतो त्याला ‘परतणारा मौसमी पाऊस’ किंवा परतीचा पाऊस असे म्हणतात. तो पूर्व भारत, भारताच्या पूर्व किनाऱ्याचा प्रदेश आणि दक्षिण भारतात पडतो. याला ईशान्य मोसमी पाऊस असं म्हणतात. पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाला नैऋत्य मोसमी पाऊस असे म्हणतात. 

हेही वाचा!

पाऊस जून ते सप्टेंबरच का?

भारतात नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या सोबतच पाऊस आणणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला नैऋत्य मोसमी पाऊस असं म्हणतात. हे नैऋत्येकडून येणरे वारे समुद्रावरुन प्रवास करत भारतात प्रवेश करतात. मान्सून म्हणजे समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस. भारतात तीन बाजूने समुद्र आणि उत्तरेकडे जमीन आहे. जमिनीचं तापमान आणि समुद्राचं तापमान यावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास ठरतो. 


उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने तेथील हवा प्रसरण पावते. आणि तेथील दाब कमी होतो. या काळात जमिनीवरील तापमानापेक्षा समुद्राचं तापमान कमी राहातं. समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो. या दाबातील फरकामुळे समुद्रावरील वारे समुद्राकडून कमी दाब असलेल्या जमिनीकडे वाहू लागतात. या वाऱ्यात बाष्प मोठ्या प्रमाणात असते.


हे बाष्पयुक्त वारे जमिनीवरील समुदसपाटीपासून उंचावर असलेल्या भागात जातात आणि तेथून पुन्हा समुद्राच्या दिशेने फिरतात. याच काळात जेव्हा हे बाष्पयुक्त वारे जमिनीवरुन वाहतात तेव्हा हवा थंड होते. बाष्पयुक्त पाणी धरुन ठेवण्याची हवेची क्षमता कमी होते आणि ते पावसाच्या थेंबाच्या स्वरुपात जमिनीवर पडतात. भारतीय उपखंडात ही क्रिया साधारणपणे मेच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु असते. 

 Image: metropolisindia

याउलट हिवाळ्यात ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात वाऱ्याचं चक्र उलट्या दिशेनं फिरतं. या काळात जमिनीवरचं तापमान समुद्रावरील तापमानापेक्षा कमी असतं. जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे वारे जमिनीपासून समुद्राच्या दिशेने वाहतात. त्यामुळे या काळात पाऊस पडत नाही.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact