आमच्या घरात आईबाबांची सतत भांडणं होतात. त्यामुळे माझं अभ्यासात लक्षच लागत नाही. घरातल्या वातावरणामुळे मला काहीच करावंसं वाटत नाही. मी काय करु? - गौतमी, पुणे.

आई बाबांच्या भांडणाचा तुला त्रास होतो, तुझ्या अभ्यासावर, तुझ्या मूडवर त्याचा परिणाम होतो हे तू आई बाबांना सांगितलं आहेस का? सांगितलं नसशील तर नक्की सांग. ते भांडत असताना तुला हे त्यांना सांगायची कदाचित भिती वाटत असेल तर त्यांचं भांडण मिटल्यावर हे त्यांना सांगायचा प्रयत्न कर. ते दोघेही तुला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करतील.
आई आणि बाबा यांपैकी एका कुणाशी तरी तुझं जास्त जमत असेल, हो ना? कुणाशी जमतं तुझं? कुणाशी मनात आलेलं सगळंच्या सगळं तू बिनधास्त बोलू शकतेस? ज्या कुणाशी तू असं बोलू शकतेस त्यांना तू तुझ्या मनातलं सांगायचा प्रयत्न कर. थेट आईबाबांशी बोलणं तुला शक्य नसेल तर कदाचित आजी आजोबांची किंवा मावशी, मामा, काका, आत्त्या यांपैकी कुणाचीही मदत तुला घेता येईल का ते बघ.
आईबाबांच्या भांडणाचा परिणाम तुझ्या मनावर आणि अभ्यासावर होणं साहजिक आहे, पण शक्य झालंच तर त्यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष कर. दुर्लक्ष करणं सोपं नाही पण तू प्रयत्न केलास तर तुला नक्की जमेल. त्यांच्या भांडणाचा तुझ्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून तुझ्या घराजवळ राहात असलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर तुला अभ्यास करता येईल का? तुला त्यांची कंपनी मिळाली तर तुझं अभ्यासात लक्ष लागेल आणि अभ्यास छान होईल. आईबाबांनाही तू अभ्यासात मदत करा असं सांगून बघ. ते नक्की तुला मदत करतील. मग तुम्ही भांडला नाहीत की माझा अभ्यास छान होतो असं तू त्यांना सांगू शकशील.


