मित्रापेक्षा जास्त मार्क्स मिळवले तरच मी भारी; असं मम्मीपप्पांना का वाटतं?

Image: Freepik

माझे मम्मी पप्पा माझ्याशी सारखं फक्त अभ्यासाबद्दलच बोलतात. आणि त्यातसुद्धा फक्त मार्कंबद्दल बोलतात. आणि त्यातसुद्धा माझ्या मित्रांना किती मार्क्स मिळाले आणि मला किती मिळाले एवढंच विचारतात. आणि त्यांना असं वाटतं, की मला कायम माझ्या सगळ्या मित्रांपेक्षा जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत.

परवाच सहामाही परीक्षेचा इंग्रजीचा पेपर मिळाला.

पप्पांनी विचारलं, “तुला किती मार्क्स पडले?”

मी म्हटलं, “७८”

ते म्हणाले, “व्हेरी गुड. सौरभला किती मिळाले?”

मी म्हटलं, “८२”

तर ते म्हणाले, 'आणि यशला?'

मी म्हंटलं, '८५'

तर लगेच मला रागवायला लागले, 'मग तुलाच एवढे कमी का आहेत? तुला का ८०च्या वर मार्क्स मिळत नाहीत? अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हे सातवीचं वर्ष आहे. पुढच्या वर्षी तू आठवीत जाशील. अजून अभ्यास वाढेल. मग तेव्हा कसं करशील…' वगैरे वगैरे.

हेही वाचा!

माझं टाइमटेबल मीच बनवणर पण आई बाबा ऐकतच नाही!

याला काय अर्थ आहे? आधी तुम्ही ७८ मार्कांना व्हेरी गुड म्हंटलत ना? म्हणजे तुम्हाला ते व्हेरी गुड वाटले होते ना? मग माझ्या मित्रांना थोडेसे जास्त मार्क्स आहेत हे ऐकल्यावर लगेच माझे मार्क्स कमी कसे काय वाटतात तुम्हाला? गणितात पण असंच! ‘त्याला ३० पर्यंत पाढे पाठ येतात, तुला फक्त २५ पर्यंतच येतात.’ किंवा ‘त्याला मराठीच्या सगळ्या कविता पाठ आहेत, तुलाच सगळ्या कशा काय पाठ होत नाहीत?’ किंवा इंग्लिशची स्पेलिंग्ज, इतिहासातल्या सनावळ्या, भूगोलातले नकाशे, विज्ञानातल्या आकृत्या… सगळं दुसऱ्या मुलांना जेवढं येतं तेवढं मला आलं पाहिजे असं म्हणून सारखे रागवत असतात.

म्हणजे मी अभ्यास केला पाहिजे, पेपर चांगला सोडवला पाहिजे, उत्तरपत्रिका पुन्हा तपासून मग दिली पाहिजे हे सगळं बरोबर आहे. पण मला दर वेळी प्रत्येक विषयात सौरभ आणि यशपेक्षा जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत असं म्हणणं याला काय अर्थ आहे?

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact