
शाळेच्या काळात मला खूप झोप यायची. पण आत्ता सुट्या लागलेल्या आहेत तर मला लवकर जाग येते. बळजबरीने झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप येत नाही. असं का होत असेल?- अद्वैत शिंदे- इयत्ता चौथी
मोठ्या माणसांना ऑफिसला सुट्टी असली की हटकून नेहमीपेक्षा लवकर जाग येते. तुम्हा मुलांना शाळा असली की झोपून राहावंसं वाटतं आणि सुट्टी असली की जाग येते. शाळेच्या दिवशी आईबाबांनी कितीही हाका मारल्या तरी तुम्ही उठत नाही आणि सहलीच्या दिवशी मात्र आईबाबांच्या आधी उठून बसता, हो ना? तसंच आहे हे. सध्या शाळा नाही, त्यामुळे तुला माहिती आहे की उठून दंगामस्तीच करायची आहे, त्यामुळे लवकर जाग येत असेल तुला? बरोबर ना? गंमत सोड, कदाचित वर्षभर शाळेसाठी लवकर उठायची सवय असल्यामुळे तुला सुट्टीतही लवकर जाग येत असेल. तसं असेल तर ते छानच आहे.
तू लवकर उठत असशील तर आईबाबा किंवा आजीआजोबांबरोबर मस्त मॉर्निंग वॉकला जाऊ शकतोस. सूर्यनमस्कार घालू शकतोस. त्यामुळे तुझा दिवस एकदम फ़्रेश सुरु होईल. तुला दिवसभर उत्साह वाटेल. आणि मुख्य म्हणजे सुट्टीत उशिरापर्यंत झोपायची सवय लागली की शाळा सुरु झाल्यावर परत लवकर उठायला लागणार म्हणून होतो तो त्रास तुला होणार नाही.
सकाळी लवकर जाग येत असेल तर तू सूर्योदय बघायला सुरुवात कर. आकाशात किती छान रंग दिसत असतात सुर्योदयाच्या वेळी! तुला आवडेल ते बघायला. शाळा सुरु झाल्यावर चित्रकलेच्या तासाला टीचरनी वहीत निसर्ग चित्र काढायला सांगितलं की तुला त्याचा उपयोगही होईल! लवकर जाग आली की तू आईबाबांना त्यांच्या कामात छोटीशी मदतही करु शकतोस, म्हणजे त्यांची कामं थोडी सोपी होतील आणि ते तुझं कौतुकही करतील. रोज ठरविक वेळी उठलास की ठराविक वेळी झोपही येईल. त्यामुळे बळजबरीने झोपायचा प्रयत्न नाही केलास तरी चालेल, उलट मस्त लवकर उठ. मज्जा कर! लवकर उठून तू काय काय करतोस तेही आम्हाला कळव, आम्ही वाट बघतोय!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


