
परीक्षेसाठी केलेला अभ्यास नेमका परीक्षेच्या वेळी आठवत नाही असं का होतं?
- आयुष गंभीरे, छत्रपती संभाजी महाराज स्कूल, नाशिक
- याचं कारण परीक्षेची वाटणारी भीती. या भीतीमुळे आपण अभ्यास केला आहे, आपण चांगला पेपर सोडवू शकतो हा तुझा आत्मविश्वासच कमी होतो.
- परीक्षेचा अभ्यास करताना पेपर सोपा जाईल की अवघड, तो लिहिता आला नाही तर, मार्क्स कमी पडले तर? हे असे विचार तुझ्या मनात डोकावत असतील तर तुझं अभ्यासावर लक्ष केंद्रित होणार नाही. त्यामुळे हवा असलेला सराव नीट होणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला काही आठवतच नाही असं तुला वाटायला लागतं.
- ऐन परीक्षेच्या वेळेस आठवेनासं होण्यामागे आपण करत असलेल्या चुकाही कारणीभूत असतात. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अगदी परीक्षा हाॅलमध्ये जाऊन बसल्यावरही अभ्यासाची उजळणी करणं अशी सवय तुलाही आहे का? बहुतेक मुलं अशीच वागतात. एकामागोमाग एक असं भराभर वाचतच राहातात. त्यामुळे परीक्षेआधी मन शांत होणं गरजेचं असतं तसं काही होतच नाही. शेवटच्या क्षणापर्यंत उजळणी करणे, परीक्षा हाॅलमध्ये गेल्यावरही पुस्तक/ नोटस वाचत राहाणे या चुकीच्या सवयी आहेत. त्याचा फायदा नाही तर तोटाच होतो. याचा परिणाम म्हणजे परीक्षेआधी खूप गोंधळ उडतो. परीक्षेची भीती वाटायला लागते. गोंधळ आणि भीतीचा परिणाम म्हणजे ऐनवेळी उत्तरं आठवेनाशी होतात.
- परीक्षेच्या काळात हायपर होवून अभ्यास करण्याची गरज नसते. परीक्षेला शांतपणे आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाची उजळणी करणं अपेक्षित असतं. त्यामुळे तूही परीक्षेच्या काळात मन शांत ठेवून झालेल्या अभ्यासाची उजळणी कर. तू काढलेल्या नोटस वाच. तुला जे अवघड वाटलं होतं त्याची उजळणी करण्यावर भर दे. परीक्षेआधी नवीन काहीही पाठ करायला जाऊ नकोस. ते जर पाठ झालं नाही तर त्याचा मनावर ताण येतो आणि त्याची पुढची उजळणी करण्यावर परिणाम होतो. तू जर वर्षभर चांगला, समजून उमजून, खोलात जावून अभ्यास केलेला असेल तर तुला पेपर नक्की चांगला सोडवता येईल. मात्र संकल्पना नीट समजूनच घेतलेल्या नसतील आणि केवळ पाठांतरावर भर दिलेला असेल तर ऐन परीक्षेच्या वेळीच आठवेनासं होतं. तसं तुझ्याबाबतीत घडू नये याचा काळजी घेऊन तू परीक्षेची तयारी कर. तुला परीक्षेच्या तयारीसाठी बेस्ट लक!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


