तुमच्या लहानपणी तुम्ही जी मजा केली ती आम्हाला का करू देत नाही?

image : freepik

“ओके! तुम्ही सुट्टीत फार मजा करायचात. दिवसचे दिवस चिंचा, बोरं, करवंदं असलं काही तरी खायचात. किती तरी वेळ नदीत डुंबायचात… समजलं मला. मग मी काय करू?” सातवीत गेलेल्या रोहनने हाताची घडी घालून वडिलांना विचारलं.

“काय करू म्हणजे? तू काही करावंस म्हणून सांगत नाहीये. सुट्टी कशी घालवायची असते ते सांगतोय.”
“बाबा…” रोहनने कसाबसा राग आवरून शांतपणे बोलायला सुरुवात केली, “तुम्ही जी मजा केलीत ना, ती करायला आम्हालाही आवडलं असतं. पण आम्ही ती मजा करत नाही, कारण तुम्ही आम्हाला ती करू देत नाही!”
“मी? मी तुला मजा करू देत नाही? अरे अशी कोणी कोणाला मजा करू द्यायची नसते. आपली आपण मजा शोधावी लागते.”
“ओक्के!” रोहन हातातला फोन खाली ठेवत म्हणाला, “मी बाहेर जातो आणि माझी माझी मजा करायला शोधतो.” बोलता बोलता त्याने पायात फ्लोटर्स घातलेसुद्धा.
“एक मिनिट.” बाबांनी त्याला अडवलं, “कुठे चाललायस?”
“मित्रांना गोळा करून मजा करायला.”
“पण कुठे? नीट सांगून जा.”
“आता ते मी मित्रांना भेटल्याशिवाय कसं काय ठरवणार बाबा?”
“तू मला उलट उत्तरं देऊ नकोस हां.” आता बाबा चिडले. मग रोहनही चिडला.
“मग काय करू दुसरं? दर वेळी तुमच्या वेळी कशी मजा होती ते ऐकून घ्यायचं, आणि आम्हाला पण ते करू द्या म्हंटलं की तुम्ही नाही म्हणता. त्यावर काही बोलायचं नाही. तुम्ही असे बाहेर जातांना सांगून जायचात का आजीआजोबांना दर वेळी? की आम्ही दोन नंबरच्या टेकडीवर चार नंबरच्या करवंदाच्या झाडाची करवंदं तोडायला जातोय. दीड वाजता परत येऊ. असं करायचात का तुम्ही? सांग ना गं आजी. बाबा सगळं तुला सांगून विचारून करायचे का?” बापलेकाचा वाद ऐकून बाहेर आलेल्या आजीला रोहनने विचारलं.

हेही वाचा!

मला गाडी छान जमत असूनही आई बाबा चालवू देत नाही,असं का?

image : freepik

आता आजीची सॉलिड गोची झाली. कारण रोहनचे बाबा लहान असतांना कसे न सांगता सगळीकडे जायचे ते ती सांगू शकत नव्हती, कारण मग रोहनने पण तेच केलं असतं आणि ते व्हायला नको होतं. त्यामुळे आजीने रोहनच्या बाबांकडे बघितलं आणि म्हणाली,
“मी कशाला सांगू? त्यालाच विचार! काय रे? तू सांगून जायचास का मला? कुठे जातोय? कोणाबरोबर जातोय? काय करायला जातोय? परत कधी येणार? ऑ?”
“तसं नाही. म्हणजे जायचो की सांगून. म्हणजे सगळं नाही सांगायचो.” बाबांची एकदम गडबड झाली.
“बरं मग आता रोहन असं अर्धवट काहीतरी सांगून गेला बाहेर आणि आलाच नाही अंधार पडेपर्यंत तर चालणार आहे का तुला?”
“त्याला भलत्या काहीतरी आयडिया देऊ नकोस आई.”
“का रे? तू जायचास ते चालतं. मग तुझ्या पोराला का नको ती मजा?”
“आई तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. इतका ट्रॅफिक नव्हता, बाहेरची परिस्थिती इतकी वाईट नव्हती, आपलं मूल सुरक्षित असेल की नाही अशी काळजी वाटायची नाही. पण आता दिवस तसे राहिलेत का?”
“नाही ना राहिलेत? म्हणजे रोहन असा तुझ्यासारखा उनाडायला गेलेला नाही ना चालणार?”
“हो म्हणजे ते बरोबर नाहीये.”
“हो ना??? मग तुझ्या लहानपणाचे किस्से सांगून कशाला पकवतोस त्याला? एकतर सुट्टी टाक आणि त्याला तुझ्यासारखी मजा दाखवून आण आणि नाही, तर त्याला त्याची त्याची मजा करू दे सुट्टीची. काय?”
“हो, बरोबर आहे… मी बघतो कसं जमतंय ते.”
“बघ बघ… तुझे वडील तुला किती वेळ द्यायचे आणि तू रोहनला किती वेळ देतोस याचाही विचार कर.”
“हो गं आई! रोहन, तू जा खेळायला. फक्त सोसायटीच्या बाहेर जाऊ नका.” आपल्यावर गेम पडायला लागली म्हंटल्यावर बाबांनी रोहनला जवळजवळ कटवलाच. आणि त्यांनी खिशातून फोन बाहेर काढला तोच आजी म्हणाली,
“आणि त्याला सारखा सांगतोस ना? आम्ही तुमच्यासारखे सतत फोन घेऊन बसायचो नाही, त्यावेळी हे लक्षात ठेव, की तुमच्या लहानपणी फोन नव्हते म्हणून बरं! नाही तर तू काही त्यापासून लांब राहिला नसतास…”
बाबांनी निमूटपणे फोन खिशात ठेवला आणि रोहनबरोबर सोसायटीच्या आवारात का असेना, क्रिकेट खेळायला बाहेर पडले.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact