मेंदूला मोबाइलवरचे खेळ खेळायला का आवडतात?

मेंदूचे सिक्रेटस

- डॉ. श्रुती पानसे. 

Image - Google.


मेंदूला मोबाईलवरचे खेळ खरोखरच खूप आवडतात. याची कारणं खूप आहेत. एकतर खेळण्यासाठी अगदी सोपा, हलका असा तो प्रकार आहे. आपण कुठेही बसून, घरात किंवा घराबाहेर, बस , रेल्वेमध्ये सुद्धा तो हाताळू शकतो, म्हणून मोबाईलवर गेम खेळणं सोपं असतं.

याशिवाय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यांनी ते गेम तयार केलेले आहेत ते अशासाठीच तयार केलेले आहेत की मुलं जास्तीत जास्त वेळ तो खेळ खेळतील. तू थोडाच वेळ तो गेम खेळावास आणि बाकी सगळा वेळ अभ्यास करावा, मैदानावर जाऊन खेळावं, एखादी छान ॲक्टिव्हिटी करावी, सगळ्यांशी गप्पा माराव्यात, विज्ञानाचे मजेदार प्रयोग करावेत असं मुळात गेम तयार करणाऱ्यांना वाटत नाही. उलट तू मोबाईलवर जास्तीत जास्त वेळ घालवावा अशी त्यांची इच्छा असते. त्या दृष्टीने गेमचं डिझाईन केलेलं असतं. तो गेम किती मजेदार आहे, त्याच्यामध्ये तुला किती प्रकारचे कॉइन किंवा रिवार्ड्स मिळतात. यावर आपण तो गेम किती वेळ खेळतोय हे अवलंबून असतं. त्यामुळे ही खोटी खोटी बक्षीसं किंवा वरच्या लेव्हल्स या गेममध्ये असतात. याशिवाय त्यात वापरले गेलेले रंग, कमालीचं वेगवान म्युझिक आणि एकूणच गेमला असलेला वेग यामुळे मुलं जास्तीत जास्त वेळ गेम खेळतात. त्यांचा हेतू सफल होतो. पण एक लक्षात आलंय का, की तो गेम खेळून झाला की दुसरं काहीच करावसं वाटत नाही. दहा मिनिटात लगेच बोअर होतं. कारण गेम्सचा तो वेग. त्या वेगापासून बाजूला झालं की बोअर व्हायला लागतं. म्हणून इतका अतिवेग आपल्या मेंदूसाठी चांगला नाही.