मेंदूची सिक्रेटस
- डाॅ. श्रुती पानसे

आपला मेंदू पक्का काॅपी कॅट आहे. मेंदूला खूप काही शिकायचं असतं.या इच्छेतूनच तो त्याला जे दिसेल त्याचं अनुकरण करायला जातो.
केवळ मारामारीच नाही तर आपल्यासमोर जी काही कृती चाललेली असते, त्या सर्व कृतींची कॉपी करण्याचं काम आपल्या मेंदूमध्ये चालू असतं. समजा, आपल्यासमोर क्रिकेटचा सामना चालू असेल तर बॅट्समन बॅट कसा धरतो, बॉलर बॉल कसा टाकतो, एखादा फिल्डर एखादा कॅच कसा झेलतो, हे सगळं आपला मेंदू अत्यंत एकाग्रतेने, सजगतेने जर बघत असेल तर त्या वेळेला आपल्या मेंदूतले न्यूरॉनसुद्धा जागृत होतात. त्यांना त्या कृतीची कॉपी करावीशी वाटते.
हेही वाचा!
मेंदूला कार्टून्स पाहायला का आवडतं? नुसतं कार्टूनच पाहिलं तर!
याचं कारण असं आहे की समजा, आपल्याला पुढच्या काळामध्ये हा खेळ खेळायचा असेल तर त्याची एक तयारी असावी म्हणून मेंदू कॉपी करत असतो. त्याच पद्धतीने समजा आपल्यासमोर कोणी चित्र काढत असेल तरीसुद्धा त्या चित्रकार व्यक्तीने ब्रश कसा धरला आहे, रंगाची निवड कशी केली आहे हे आपला मेंदू बघतो आणि त्यानुसार तो चित्र काढायला प्रवृत्त होतो.
म्हणजेच आपल्या मेंदूचा हा गुण आहे की समोर चाललेली कृती तो मेंदू कॉपी करतो आणि त्यानुसार शिकत जातो. समोर चाललेली कृती ही चांगली आहे, की हिंसक आहे हे तारतम्य त्यावेळेला मेंदूला नसतं, जे काही समोर चालू असेल ते सर्व मेंदूला साठवून ठेवण्याची त्याची क्षमता असते. थोडक्यात, आपला मेंदू पक्का कॉपीकॅट असतो. त्याला खूप काही शिकायचं असतं. दुसऱ्याचं बघून शिकायचं ही अनुकरणशीलता त्याच्यात असते. पण म्हणून आपण मारामारी शिकायची नसते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


