मेंदूची सिक्रेटस
- डॉ. श्रुती पानसे

छोट्या मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा मोबाईल बघायला खूप आवडतो, याचं कारण तो खरोखरच कामाचा आहे. पण समस्या अशी आहे की जेवढा तो कामाचा आहे तेवढाच तो मनोरंजनासाठी सुद्धा वापरता येतो आणि इथेच सगळी समस्या दडलेली आहे. आपला खूपच्या खूप वेळ त्यावर जातो. हा वेळ कसा गेला हे कळतही नाही.
लहान मुलं गेम खेळायला, युट्युबवर वेगवेगळे व्हिडिओ बघायला मोबाइल वापरत असतात. मोबाइल आईबाबांचा असला तरी हातात येतो तेव्हा आपण एकटेच त्याचा हवा तसा वापर करू शकतो. टीव्हीचं तसं नसतं. घरातला टीव्ही चालू केला की अनेकांना त्याच्यावर काय बघायचं आहे, यानुसार टीव्हीवर काय लावायचं हे ठरतं. मोबाइलचं तसं नसतं. तो सतत हातात असतो. म्हणून बाहेर गेलेलो असताना, आई बाबा वेगळे काम करत असताना मुलं सहजपणे मोबाइल हाताळू शकतात.
मोबाइल आवडण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावर असलेला भरपूर कंटेंट. गाणी ऐकायची वाटत असतील, एखाद्या प्रश्नांची उत्तर हवी असतील, एखादी माहिती हवी असेल तर ती युट्युबवर आहे. काही वेळा तर एखादं गणित कसं सोडवायचं याची माहिती युट्युबवरून असते. म्हणजे ते खूप उपयोगी आहे. हाताने एखादी वस्तू करायची असेल, एखादं चित्र काढायचं असेल, प्रयोग करायचा असेल तर त्यावर मार्गदर्शन मिळू शकतं. हवे तेवढे गेम उपलब्ध असतात, त्या गेममधली हलती, रंगीत चित्रं, त्यात दिलेली बक्षिसं अशा सगळ्या कारणाने आपल्याला मोबाइल बघायला आवडतो.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


