मेंदूचे सिक्रेटस
- डाॅ. श्रुती पानसे

मोबाइल बघत एका जागी किती वेळ बसायचं आणि का, याचा आधी विचार करायला हवा. एका जागेवर खूप वेळ बसल्यामुळे शरीर थकून जातं. आपले डोळे सतत काहीतरी बघत असतात. जे बघितलं ते लगेचच मेंदूकडे पाठवत असतात. साहजिकच डोळ्यांना खूप काम पडतं. जे आपण मोबाइलवर बघतो आहे ते कितपत महत्वाचं आहे? बघितलं नाही तर चालणार नाही का? कारण आपण जे बघतो त्यात ८० – ९० टक्के कचरा असेल तर मेंदूला किती तो त्रास? नको असलेली कचरा माहिती घ्यायची, ती मेंदूकडे पाठवायची. मेंदूवरचं ओझं असं सारखं वाढतच असतं.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका वेळी खूप वेळ एका जागी बसणं मेंदूला जास्त आवडत नाही. कारण मेंदूला ज्या प्रकारची चालना हवी असते, ती मोबाइलवरच्या खेळातून मिळत नाही. मोबाइल गेम खेळून फारच थोडी चालना मेंदूला मिळते, ती पण चुकीच्या पद्धतीची. संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा खेळणे हा जो प्रकार असतो, तो मोबाइल गेम खेळल्यामुळे अजिबातच होत नाही. यामुळे मेंदूला दिवसातल्या अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवणं आवडत नाही.
विशेषतः आत्ता बुद्धी आणि तुझं शरीर हे दोन्ही वाढीच्या वयात आहे अशा वेळेला मेंदूला जास्तीत जास्त ऊर्जा मिळेल असा खुराक मिळणं आवश्यक असतं. पण तो जर देऊच केला नाहीस तर मेंदू खूप कंटाळून जाईल त्यामुळे असं करणं टाळावं .अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जर आपण एका जागेवर बसून आहोत असं लक्षात आलं तर उठून खेळायला जाणं फार आवश्यक आहे.
25


