-डॉ. वैशाली देशमुख
तुम्हाला जस्टीन बीबर माहिती असेल ना? फेमस कॅनेडियन पॉप सिंगर? एकदा पेपरमध्ये त्याच्याविषयी बातमी आली होती. तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. बातमी अशी होती, ‘जस्टीन बीबरच्या करियरला सगळ्यात मोठा धोका- फुटलेला आवाज!’
तुमच्या मनात उठलेले प्रश्न ऐकू येतायत मला- ‘फुटलेला आवाज? म्हणजे काय असतं? ते काय भांडं आहे का फुटायला?’ पण असं घडतं खरं.
बहुतेक मुलांमध्ये साधारण ११ वर्षांच्या नंतर सोळा वर्षांपर्यंत कधीतरी हे सुरू होतं. बोलायला तोंड उघडलं की कसला आवाज बाहेर येईल कोण जाणे, अशी भीती वाटायला लागते. जस्टीनसारख्या अनेक गायकांना आवाज फुटल्यामुळे गायला अडचण झाल्याच्या कथा आहेत. त्यातले काहीजण निराश झाले, काहीजणांनी चक्क गाणं सोडून दिलं. पण ‘हेही दिवस जातील’ यावर ज्यांचा विश्वास होता, ते प्रयत्न करत राहिले आणि त्यातून यशस्वीपणे बाहेर पडले. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. हा आवाज काही असाच विचित्र राहणार नाहीये. फक्त काही महीने जाऊ द्या. तोपर्यंत स्वरयंत्राची वाढ पूर्ण होईल, आवाजाला शिस्त लागेल आणि तो मोठ्या माणसांसारखा भारदस्त येईल. मधल्या काळात तुम्हांला जरा अडचणीचं होईल, हे खरं. थोडी एकमेकांना चिडवाचिडवीही होऊ शकेल, कारण प्रत्येकाचा आवाज वेगवेगळ्या वेळी फुटतो ना!

Image: metroparent
हेही वाचा!

Image: newfolks
मुलांचा आवाज का फुटतो?
आपला आवाज येतो कुठून हे माहितेय ना तुम्हांला? तो येतो आपल्या गळ्यातल्या स्वरयंत्रातून (larynx). आपल्या फुप्फुसांतून बाहेर येणारी हवा आणि आवाजाची ही पेटी, या दोन्हींच्या मदतीनं आपल्या घशातून आपण आपल्याला हवे ते आवाज काढू शकतो, बोलू शकतो, गाऊ शकतो. वयात येताना टेस्टोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन या स्वरयंत्राचा आकार वाढवतं. मुलांच्या गळ्यावर कंठ किंवा घाटी दिसायला लागते. त्याला 'ॲडम्स ॲपल' ( Adam’s apple)असंही म्हणतात. त्याच्या आतले पडदे काहीसे जाडसर होतात. साहजिकच बाहेर पडणारा आवाज बदलतो. आणि नुसता बदलत नाही, तर तो चक्क फुटतो. कधी बेसूर, कधी भसाडा, तर कधी चिरका!
मुलींच्या स्वरायंत्रात होणारे बदल इतके जास्त नसतात. त्यामुळे त्यांच्या आवाजात थोडा प्रौढपणा येतो, पण मुलांप्रमाणे मुलींचा आवाज फुटत नाही.
हेही वाचा!
आपल्या गाण्यानं सगळ्यांना वेड लावणारा जस्टीन यापुढे गाऊ शकेल की नाही अशी त्याच्यासकट सगळ्यांना भीती वाटायला लागली होती. पण ती भीती अर्थातच खोटी ठरली. त्याचा फुटलेला आवाज हळूहळू स्थिरावला. आणि तो वेगळ्या, अधिक परिपक्व आवाजात पुन्हा जोमानं परतला. अजूनही जगभर त्याचे कितीतरी कार्यक्रम होत असतात.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact