घरी पाहुणे आले की माझा संताप होतो! किती प्रश्न विचारतात ते..

 -डॉ. वैशाली देशमुख

आज घरी पाहुणे येणार होते. हे ऐकून टीनाच्या कपाळावर आठी उमटली.  आजकाल तिला एकटं असायलाच आवडायचं. हं, मैत्रिणी कधीही आल्या तरी चालतील, पण पाहुणे? ते आले म्हणजे त्यांचे प्रश्न आले, सल्ले आले. शिवाय आईबाबांच्या हजार सूचना आल्या. नकोच ते. आणि खरोखर तसंच झालं. पाहुणे गेल्यावर टीनाच्या मनात विचार तडतडायला लागले. अगदी गरम तव्यावर टाकलेले पॉपकॉर्न कसे तडतडतात, तसे. ‘हे आईबाबा समजतात तरी काय आम्हांला! बघावं तेव्हा यांची कटकट. मी काय कुक्कुलं बाळ आहे का आता? सारखं आपलं, ‘हे कर, ते करू नकोस’. आपली मुलगी म्हणजे अगदी आदर्श असायला हवी लोकांसमोर असा त्यांचा हट्ट का असतो? मग पाहुणे आले की आगीत तेल. त्यांच्या सूचना अगदी नको नको होतात. ती मावशी तर चक्क म्हणाली की मला म्हणे 'फार शिंगं फुटली आहेत.’

हेही वाचा!

टीनाच्या मनात उलटसुलट विचार का?

कारण टीनाचा मेंदू आता मोठा होतोय. म्हणजे आकारानं नव्हे, पण विचारानं. आपण स्वतंत्र झालोय, आपल्याला सगळं कळतं असा तो आता विचार करतोय. निसर्गाची तशी इच्छा आहे. मुलांनी हळूहळू मोठं व्हावं, स्वत:ची जबाबदारी घ्यावी आणि मग इतरांचीही घ्यायला तयार व्हावं यासाठी तर तुमच्यात बदल होतायत! म्हणजे बघा हं, आधी तुमची शारीरिक ताकद वाढते. उंची, वजन, हाडं, स्नायू! मग त्याचबरोबर तुमच्या भावना किंवा feelings तीव्र व्हायला लागतात. आणि सगळ्यात शेवटी तुमचे विचार ताकदीचे होतात. हा सगळा प्रवास नवव्या-दहाव्या वर्षी सुरू होऊन साधारण पंचविसाव्या वर्षांच्या आसपास पूर्ण होतो. तुमचं वय किती आहे आत्ता? करा बरं हिशोब. या प्रवासात आपण कुठे पोचलोय याचा थोडाफार तरी अंदाज येईल तुम्हाला.

Image: indianexpress

हेही वाचा!

ही सगळी चर्चा आपण का करतो आहोत? आपल्या मनाच्या ताकदीचा आपल्याला अंदाज यायला हवा म्हणून! तो अंदाज आला तर आपल्याला कधी, कसं वागायचं हे सुचेल. कुणी काही बोललं की लगेच रागाचा पारा शंभरच्या वर चढणार नाही. नाहीतर नुसतीच चिडचिड होत राहील टीनासारखी. आणि आपल्याला माहितेय की आपण सगळ्यात जास्त चिडचिड आपल्या आईबाबांवर, विशेषत: आईवर करतो. खरंतर आपल्याला त्यांच्याबद्दल खात्री असते, की काहीही झालं तरी ते आपल्यावर प्रेमच करणार, आपल्याला झिडकारणार नाहीत. पण अशी खात्री असेल, तर त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की चिडायचं? सांगा बरं विचार करून!


(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)

vrdesh06@gmail.com

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact