‘तुम्ही चुकताय!’ हे मोठ्यांना सांगण्याइतपत मुलांना खरंच समजतं?

 Image: .freepik

'हल्लीच्या मुलांना कसलं काही वाटतंच नाही.. वागता बोलताना दुसऱ्याच्या मनाचा जराही विचार करत नाही ते!' आई बाबांच्या संभाषणातलं हे वाक्य रोहनच्या कानावर पडलं. पण आपण तर काहीच चुकीचं वागलो नाही, म्हणजे आई आपल्याबद्दल नसेलच बोलत असा विचार करुन रोहनने पुन्हा आपलं डोकं भूगोलाच्या पुस्तकात घातलं. नववीत शिकणाऱ्या रोहनचा सहामहीचा दुसऱ्या दिवशी सोमवारी शेवटचा पेपर होता. बऱ्याच वेळ एका जागी बसून अभ्यास करणाऱ्या रोहनला थोडा ब्रेक घ्यावासा वाटला. म्हणून तो हाॅलमध्ये बसायला आला. आईची परवानगी घेवून त्याने टी.व्ही लावला आणि त्याच्या आवडीची कौन बनेंगा करोडपती कार्यक्रम बघू लागला. रविवार होता त्यामुळे आई पटापट कामं हातावेगळी करत होती. दिवाळी तोंडावर असल्याने तिने स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं. दुपारी १२ वाजता आलेल्या रेखा मावशींना तिने अडीच वाजता बोलावलं. सगळी कामं आटोपल्यावर रेखाला कुठे जाण्याची घाई राहणार नाही म्हणून आईने रेखा मावशीला उशीरा बोलावलं. रेखा मावशीही हो म्हणून दुसऱ्या कामाला निघून गेल्या.

दोनपर्यंत आईची बाकीची कामं उरकली आणि स्वयंपाकघर आवरण्यासाठी ती रेखा मावशीची वाट पाहू लागली. अडीच वाजले, पावणे तीन वाजले, तीन वाजून सव्वा तीनही वाजून गेले तरी रेखा मावशी आल्या नाही. मग काय आईचा पारा चढला. 'ही काय पध्दत झाली का? सांगितलेल्या वेळेत येता येत नाही म्हणजे काय? सगळी कामं खोळंबून बसलेय मी आणि हिचा काही पत्ताच नाही. येवू दे रेखाला.. आज चांगलीच खडसावते तिला. माझं पुढच्या कामाचं काही शेड्यूल असेल की काय...याची काहीच पर्वा नाहीये तिला, किती हा बेजबाबदारपणा!'

हेही वाचा!

आई रेखा मावशीवर वैतागून स्वत:शीच मोठ्याने बोलत होती. रोहन सर्व ऐकत होता. आई चिडली आहे, रेखा मावशीला उशीर झाला आहे, आईला खूप कामं आहेत हे सर्व रोहनलाही दिसत होतं. पण तरीही आई उगाच रेखा मावशीवर वैतागते आहे. ती तर रोजच्या वेळेप्रमाणे बरोबर १२ वाजता आली होती. आईनेच तिला परत पाठवलं. स्वत:ची चूक असूनही आई रेखा मावशीबद्दल रागाने बोलतेय, हे काही रोहनला पटत नव्हतं. शेवटी न राहवून तो आईला म्हणालाच, ' आई रेखा मावशीवर कशाला वैतागतेस? खरंतर तुझीच चूक आहे, तूच त्यांना परत पाठवून दिलंस ना!

हे ऐकून आईचा पारा आणखीनच चढला. आपल्या आईची काळजी नाही याला, आला मोठा माझ्या चुका दाखवायला असा विचार करुन आई रोहनवरच ओरडली. ' तू गप्प बस रे.. कशाला मध्ये बोलतोस, काही माहिती का तुला, आणि काय चुकीचं बोलले रे मी? माझ्या पुढच्या कामांचं शेड्यूल आहे ना ठरलेलं. तुला काय जातंय आयतं बसून बोलायला?'

'हो का.. तुझं शेड्यूल  आणि मग रेखा मावशीच्या शेड्यूलचं काय? तिचं शेड्यूल तर तुच बिघडवलं ना. तुला तरी रविवारी सुटी असते, रेखा मावशी तर रविवारीही कामावर येतात. त्यांची कही चूक नाहीये, तुझीच चूक आहे सगळी.. तूच त्यांना उशीरा यायला सांगितलं!' रोहनने आईची चूक दाखवून दिली होती. पण आई तेव्हा संतापलेली होती. रागानेच ती रोहनला म्हणाली, ' हो सगळं माझंच चुकतं बाळा !' असं तिरकस बोलत आई स्वयंपाकघरात जायला निघाली. तेवढ्यात बाबाही या वादात पडले. 'मधू रोहन बरोबर बोलतोय.  का रेखावर चिडतेस.. येईल थोड्या वेळाने. असेल काही अडचण तिला! बाबाही रोहनसारखंच बोलताना पाहून आई आणखीनच संतापली. बाबांकडे रागाने बघून ती स्वयंपाकघरात निघून गेली. पण आता तिची आदळ आपट कमी झाली होती. रोहन आणि बाबांचं बोलणं कदाचित आईला पटलं होतं, पण ते तिनं दाखवलं नाही.

'शाब्बास रोहन!' म्हणत बाबांनी रोहनला शाबासकी दिली. पण आपल्याला का शाबासकी मिळाली हेच रोहनला कळत नव्हतं. त्याने प्रश्नार्थक नजरेने बाबांकडे बघितलं. ' अरे रोहन तू योग्य विचार केलास. दुसऱ्यांचा विचार करुन बोललास त्याबद्दल शाब्बास. असाच दुसऱ्यांचा विचार करावा. उगाच त्रागा करु नये.. काय मधू आलं ना लक्षात. जरा रोहनकडूनही शिक थोडं' बाबा मजेने म्हणाले.. ' हो आता त्याच्याकडूनच शिकण्याची वेळ आलीये माझ्यावर' आई म्हणाली. पण आईचा आवाज आता नाॅर्मल होता.

हेही वाचा!

तितक्यात बेल वाजली. दारात रेखा मावशी होत्या. दार उघडताच रेखा मावशी लगबगीनं स्वयंपाकघरात गेल्या. ' अहो ताई पाटील काकूंनीही आज किचन आवरायला काढलं आणि झाला वेळ. काम झाल्याबरोबर तुमच्याकडे आली. खूप उशीर झाला का मला? ' आता काही खरं नाही रेखा मावशीवर आई चिडणार असं रोहन आणि बाबांना वाटलं आणि त्यांनी कान टवकारले. पण झालं उलटंच. आई म्हणाली, ' होवू दे उशीर.. आधी जरा दहा मिनिटं बसं. मी मस्त चहा करते आपल्या दोघींना मग लागू कामाला!' आईचं बोलणं ऐकून रेखा मावशीही खूष झाल्या. मग काय त्यांची गप्पांची गाडी सुरु झाली. आत्ता ती काम संपेपर्यंत थांबणार नव्हती. थोड्या वेळापूर्वी रेखा मावशीवर आई चिडली होती हे आता तिच्या बोलण्यावरुन वाटतंच नव्हतं. आईला तिची चूक कळली होती आणि रोहनालाही बाबांकडून शाबासकी मिळाल्याने तो आनंदी होता.

'मधू मलाही चहा हवा आहे. मी पण तुम्हा दोघींना मदत करणार आहे!' म्हणत बाबा स्वयंपाकघरात गेले.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact