पतंग उडवणाऱ्या मुलांवर आणि उडणाऱ्या पतंगांवर पक्ष्यांनी केला हल्ला!

 

Image: freepik.

आपण उडवत असलेल्या पतंगांच्या दिशेला येणारा मोठ्ठा काळा ढग बघून रिया आधी थोडी घाबरली. पण जरा वेळाने तिच्या लक्षात आलं की तो ढग नसून भला मोठा पक्ष्यांचा थवा आहे, आणि तो ठरवून हल्ला केल्यासारखा त्यांच्या दोन पतंगांकडे येतोय. मग तर ती सॉलिडच घाबरली. आणि तिने हातातला मांजा सोडून दिला. तिच्या पतंग हेलकावे खायला लागला.

एव्हाना सूरज आणि केदारच्या पण लक्षात आलं होतं की काहीतरी गडबड आहे. पण सूरजने हातातला मांजा पक्का पकडून ठेवला.

तो थवा जसा जवळ आला तसं त्या चौघांच्या आणि आजूबाजूच्या बिल्डिंगच्या गच्चीवरून पतंग उडवणाऱ्या सगळ्यांच्याच लक्षात आलं, की तो थवा काहीतरी वेगळाच होता. एरवी एका थव्यात एकाच प्रकारचे पक्षी असतात, पण या थव्यात मात्र पोपट, कावळे, बगळे, बुलबुल, साळुंक्या, कबुतरं असे शहरात कायम दिसणारे पक्षी होते. आता शहरांमधून दिसेनाशा झालेल्या चिमण्या होत्या. हळद्या, सुतारपक्षी, घुबड असे मनुष्यवस्तीपासून जरा लांबच राहणारे पक्षी होते. आणि सगळ्यात मागे गरुड आणि गिधाडं पण होती.

हा काय प्रकार आहे हे बघायला सगळे जण जिथे होते तिथे उभे राहिले. तर त्या थव्याने पतंगांच्या जवळ आल्याबरोबर कामाला सुरुवात केली. जणू काही त्यांची कामं आधी ठरलेली असावी.

हेही वाचा! 

मुलींनाही पतंग उडवता येतो.पेच लावून दाखवा.रियाने दिले चॅलेंज!

चिमण्या, बुलबुल,साळुंक्या अशा लहान पक्षांनी पतंगांची मंगळसूत्र सोडून द्यायला सुरुवात केली. कावळे, कबुतर अशा जरा मोठ्या पक्षांनी चोचीने मांजा तोडून टाकायला सुरुवात केली. आणि हे करून पण जो पतंग सुट्टा होणार नाही त्यावर गिधाड आणि गरुडांनी सरळ धडका मारून ते पतंग फाडून टाकायला सुरुवात केली. आणि हळू हळू हे लक्षात आलं, की हे पक्षांनी सगळ्या शहरात केलं होतं. आकाशात उडत असलेले सगळे पतंग फाडून तोडून टाकल्यानंतर एका मोट्ठ्या गरुडाने सूर मारला आणि तो सरळ रिया आणि अयान उभे होते त्या गच्चीत यायला लागला.

image : AZ Animals

एवढा मोठा गरुड आपल्या अंगावर येतोय म्हंटल्यावर साहजिकच अयान आणि रिया घाबरून जिन्यात दोन पायऱ्या खाली उतरून उभे राहिले. त्यांच्याकडे बघून केदार आणि सूरज हसायला लागले. पण त्यांचं हसणं अर्धंच राहिलं. कारण त्या गरुडाने अयान आणि रियाच्या गच्चीतले खाली ठेवलेले सगळे पतंग फाडून टाकले आणि  चिडून केदार आणि सूरजकडे गेला. त्यांच्याकडे बघून तो अजूनच चिडला असावा, कारण सूरजने अजूनही हातातला मांजा धरून ठेवलेला होता. त्यामुळे की काय, पण गरुडाने पतंगावर हल्ला करायच्या ऐवजी डायरेक्ट सूरजवरच हल्ला केला. सूरज कसाबसा पटकन हातातला मांजा सोडून जिन्यात पळून गेला, केदार केव्हाच हातातली चक्री टाकून पळाला होता.

सगळीकडच्या गच्चीतली मुलं आपापल्या घरात पळून गेलेली होती. पक्ष्यांनी हल्ला केला, शहरातले सगळे पतंग आणि मांजा तोडून फाडून टाकले आणि ते आले तसे थव्याने उडून गेले. काय होतंय ते मुलांना कळेचना. पण घराच्या खिडकीतून जेव्हा सगळे पक्षी गेलेले दिसले तेव्हा एक एक मूल गच्चीत येऊन बघायला लागलं. अयान आणि रिया पण बाहेर आले. आणि बघतात तर काय? सगळ्या गच्चीभर, रस्त्यात पतंगांच्या कागदांचा खच पडलेला, त्यात मांज्याच्या तुकड्यांचा गुंता झालेला, कुठे कुठे पक्ष्यांनी सगळाच्या सगळा मांजा ओढून काढून चक्रीच्या चक्री रिकामी करून टाकली होती. 

image : flickr

समोरच्या गच्चीत केदार आणि सूरज पण डोक्याला हात लावून उभे होते. काय होतंय ते कोणालाच कळत नव्हतं. सूरज आणि केदार सगळं भांडण विसरून विचारायला लागले,

“अरे एवढे पक्षी कुठून आले होते?”

घाबरलेली रिया पण भांडण विसरली होती. ती म्हणाली,

“माहिती नाही. पण त्यांनी आमच्या पतंगांचे तुकडे करून टाकलेत.”

“आमचा तर सगळा मांजा घेऊन गेलेत पक्षी!” केदारने हातातली रिकामी चक्री दाखवली.

“पण का केलं त्यांनी असं?” अयान म्हणाला.

“काय माहित?” सूरज म्हणाला, “आणि आता आपल्याला परत पतंग आणायला कोणी पैसे पण नाही देणार!”

“शी यार!” रिया म्हणाली आणि गच्चीत खाली बसली. अयानपण हताश होऊन खाली बसला. आता काय करावं असा दोघं  विचार करत होते तेवढ्यात त्यांना कोपऱ्यातून आवाज आला.
“गूं गूं… गुटर्रर्रर्रगूं… गुटर्रर्रर्रगूं!”

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact