ओमान, बिपरजाॅय, निसर्ग. चक्रीवादळांना अशी नावं कोण देतं?

Image: freepik

बिपरजाॅय हे नाव तुम्हाला कसं वाटलं? हे नाव तुम्ही एव्हाना भरपूर वेळा वर्तमानपत्रात वाचलं असेल, यासंबंधीच्या बातम्या तुम्ही टीव्हीवरही पाहिल्या असतील. हे नाव चक्रीवादळाचं आहे. उत्तर हिंदी महासागरातील हे २०२३ मधील दुसरं चक्रीवादळ आहे. त्याआधी मोचा नावाचं चक्रीवादळ आलं होतं. आता तुम्ही म्हणाल चक्रीवादळ म्हणजे किती नुकसान, किती पडझड. अशा चक्रीवादळात कधी माणसांची घरं कोसळतात, कधी गाड्या पत्त्यांसारख्या उडतात. इतका विध्वंस करणाऱ्या या चक्रीवादळांची नावं मात्र एकदम भारी असतात. या चक्रीवादळांची नावं कोण बरं ठेवत असतील? अशा प्रश्न मुलांनाच काय मोठ्यांनाही पडतो.

हेही वाचा! 

चक्रीवादळांची नावं कोण ठरवतं?

आता बिपरजाॅयचंचं उदाहरण घेऊ. भारताच्या पश्चिमेकडे हे वादळ अरबी समुद्रात तयार झालं आहे. बांगलादेशने शिफारस केलेल्या बांगला भाषेतील हे नाव म्हणजे बिपरजाॅय. याचा अर्थ 'आपत्ती' असा होतो. बांगलादेशने हे नाव ठेवण्यामागे एक नियम आहे,एक इतिहास आहे. या चक्रीवादळाचे नाव जागतिक हवामान संघटनेने म्हणजे ( WMO) केलेल्या नियमानुसार दिलेलं आहे. डब्लूएमओने केलेल्या नियमानुसार जगभरातील उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांना नाव देण्याचं काम सहा प्रादेशिक विशेषीकृत हवामान केंद्र( RSMCS ) आणि पाच प्रादेशिक उष्ण कटिबंधीय वादळ इशारा केंद्राना (TCWCS) देण्यास सांगण्यात आलं आहे.

या नियमानुसार दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांची जबाबदारी भारतीय हवामान विभागावर (IMD ) येते. भारतीय हवामान विभाग हे RSMCS मधील १३ देशांंसाठी जबाबदार आहे. यात भारत, बांगलादेश, इराण, म्यानमार, मालदीव, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांचा समावेश होतो.

एप्रिल २०२० मध्ये भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळांसाठी १६९ नावांची एक नवीन यादी तयार केली आहे. या यादीत प्रत्येक देशाने १३ नावं सूचवली आहेत. ही नावं १३ याद्यांमध्ये विभागली गेली. प्रत्येक यादीमध्ये प्रत्येक देशाकडून आलेल्या एका नावाचा समावेश केला गेला. चक्रीवादळांना नावं देताना ती यादीनुसार आणि यादीतील वर्णक्रमानुसार दिली जातात. या यादीतील नावं हिंदी महासागर आणि दक्षिण पॅसिफिक प्रदेशात निर्माण होणाऱ्या नवीन चक्रीवादळांना दिली जातात. यादी क्रमांक १ मधील सर्व नावं वापरुन झाल्याने यादी क्रमांक २ मधील बिपरजाॅय हे नावं या चक्रीवादळाला दिलं गेलं.

राष्ट्रीय चक्रीवादळ समिती ही अटलांटिक समुद्रातील चक्रीवादळांच्या नावांची यादी आधीच ठरवते. येथे सहा याद्या केल्या जातात. आळी पाळीने त्या याद्या वापरल्या जातात. २०१८ साली वापरलेली चक्रीवादळांच्या नावाची यादी सहा वर्षानंतर म्हणजे २०२४ मध्ये पुन्हा वापरण्यात येते. असंच पुढेही सुरुच राहणार आहे.

चक्रीवादळांना नावं का दिली जातात?

जगभरात कुठे ना कुठे वादळांचे, चक्रीवादळांचे थैमान सुरुच असते. पत्रकारांना या चक्रीवादळांचं रिपोर्टिंग करताना सोयीचं जावं, परिसरातील लोकांना जागरुक करण्यासाठी हवामान खात्याने चक्रीवादळाला धरुन दिलेल्या सूचना लक्षात ठेवण्यासाठी लोकांना सहज उच्चारता येतील , लक्षात राहतील अशी नावं वादळांना देण्याची शिफारस करण्यात आली. १९ व्या शतकापासून वादळांना नावं देण्याची पध्दत सुरु झाली. पण सुरुवातीला चक्रीवादळांना नावं ठरवताना विशिष्ट नियम नव्हते. त्यामुळे त्याच त्याच नावांचा पुन्हा पुन्हा वापर केला जायचा. त्यामुळे सगळ्यांचाच गोंधळ उडायचा. १९५३ मध्ये अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळाला नावे देण्याचा करार करण्यात आला. १९५३ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भ्रष्ट नेत्यांच्या नावावरुन चक्रीवादळाला नाव दिलं जायचं. तर अमेरिकेत वादळांना महिलांच्या नावावरुन नाव दिले जायचे. १९७८ मध्ये चक्रीवादळांना नावे ठरवण्याची पध्दत बदलली. पहिल्या वादळाचं नाव पुरुषाच्या नावावरुन तर त्यानंतर येणाऱ्या वादळाचं नाव स्त्रियांच्या नावावरुन ठेवण्याची पध्दत सुरु झाली. चक्रीवादळांना तांंत्रिक किंवा अंकाच्या स्वरुपात नाव ठेवलं तर ते लक्षात ठेवण्यासाठी अवघड होतं, हे लक्षात घेवून चटकन ओळखता येतील, त्या त्या देशांमध्ये प्रचलित असलेले , माहित असलेले, लोकांना सहज उच्चारता येतील, लक्षात राहतील अशी नावं चक्रीवादळांना देण्याची पध्दत रुढ झाली. म्हणूनच आता फुलं, नद्या, विशिष्ट शब्द, प्राणी यांची नावं चक्रीवादळांना दिली जातात.

जर एखादं वादळ खूपच संहारक असेल, त्या वादळाने न भूतो न भविष्यती असं नुकसान केलं असेल तर त्या वादळाला दिलेलं नाव पुन्हा वापरलं जात नाही. या विशिष्ट चक्रीवादळाची नोंद इतिहासात कायम राहावी, या वादळाचं स्वरुप काय होतं, त्याचे परिणाम काय होते हे कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी, त्याची नोंद ठेवण्यासाठी  असा नियम केला गेला आहे. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact