
Image: bbc
उष्ण तापमान, कडक ऊन असलेल्या वाळवंटात बर्फवृष्टी होणं, बर्फ पडणं ही गोष्ट म्हणजे थाप, कल्पना किंवा स्वप्नच वाटावं. पण सहारासारख्या अतिशय उष्ण वाळवंटात बर्फ पडणे ही गोष्ट म्हणजे थाप, कल्पना, स्वप्न किंवा खोटी गोष्ट नाही. तर ही घटना खरी आहे. केवळ एकदा नाही तर अनेकदा सहारा वाळवंटात बर्फ पडल्याची नोंद आहे. आपल्यासाठी ही बाब आश्चर्यकारक असली तरी अभ्यासक म्हणतात, की वाळवंटात बर्फ पडणं ही बाब दुर्मिळ वाटत असली तरी अशक्य नाही. हे असं घडतं, घडलं आहे आणि यापुढेही घडेल.
हेही वाचा!
बर्फ पडण्यासाठी वातावरणात दोन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे थंड तापमान आणि हवेतील आर्द्रता. वातावरणातील विशिष्ट प्रकारची हवा, जमिनीवरील पृष्ठभागाचं तापमान यावर बर्फ पडण्याची क्रिया अवलंबून असते. सहारा वाळवंट हे जगातील सर्वात उष्ण वाळवंट म्हणून ओळखलं जातं. या वाळवंटात ५३ अंश सेल्सिअस इतकं उच्च तापमान नोंदवलं गेलं आहे. पण इथली मोकळी जमीन, निरभ्र आकाश यामुळे थंडीच्या काळात रात्री सर्वात कमी तापमानही सहारा वाळवंटात नोंदवलं गेलं आहे. २००५ च्या जानेवारीत उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात सहारा वाळवंटातील अल्जेरिया येथे उणे १४ अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान होतं.

Image: skymetweather
सहारा हे जगातील सर्वात उष्ण आणि विस्तृत वाळवंट आहे. या वाळवंटाच्या परीघात उत्तर आफ्रिकेतील अल्जेरिया, चाड, इजिप्त, लिबिया, माली, माॅरिटॅनिया, मोरोक्को, नायजेर, पश्चिम सहारातील सुदान आणि ट्युनेशिया हे देश येतात.

Image: skymetweather
सहारा वाळवंटात बर्फ का पडला?
सहारा हे जगातील सर्वात उष्ण वाळवंट असलं तरी सहारा वाळवंटाच्या तीन बाजूंनी समुद्र आहे. पश्चिमेला अटलांटिक समुद्र, पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्यसागर आहे. तर सहाराच्या दक्षिणेला साहेल सावनाह आहे जिथे काही काळ थोडा पाऊस पडतो. हिवाळ्यात अटलांटिक आणि भूमध्यसागराकडून उत्तर सहाराकडे थंड, आर्द्र हवा खेचली जाते. याकाळात उत्तर सहारा भागात अतिशय थंड वातावरण असतं मोरोक्को आणि अल्जेरिया हे सहारा वाळवंटातील भाग ॲटलस पर्वतावर उंच ठिकाणी आहेत. हिवाळ्यात आधीच वातावरण गार आणि त्यात जर हवेत आर्द्रता असेल तर अति थंड वातावरणाने हवेतील आर्द्रता गोठते. बर्फाचे स्फटिक ओतात. त्यामुळे जमिनीवर बर्फाची चादर पसरते. आणि या काळात जमिनीच्या पृष्ठभागावरचं तापमानही थंड असेल तर बर्फ लगेच वितळत नाही. अशा प्रकारच्या हवामानाच्या स्थितीमुळे आणि उंच पर्वताच्या सान्निध्यामुळे सहारा वाळवंटात बर्फ पडू शकतो.
सहारा वाळवंटाचा मध्यभाग अतिशय शुष्क आहे. या भागात वर्षभरात फक्त १०० मिलीपेक्षाही कमी पाऊस पडतो. पण सहाराच्या चार कडांपैकी तीन कडांकडे पाण्याचं अस्तित्त्व आहे. अटलांटिक समुद्र, भूमध्य समुद्र, हिंदी महासागर येथून हिवाळ्यात उत्तर सहारात कमी दाबाच्या चक्रीवादळाने आणि उन्हाळ्यात दक्षिण सहारातील मान्सूनच्या पावसाने ओली आर्द्र हवा वाहात येते. त्यामुळेच सहारच्या मध्यभागापेक्षा सहारा वाळवंटाच्या परिघावरील भागातील हवेत आर्द्रता असते. म्हणूनच सहारा वाळवंटाच्या उत्तर भागात काही वेळा बर्फ पडला आहे. एइन सेफ्रा या अल्जेरियन शहरात उत्तर गोलार्धातील थंडीच्या काळात १९७९ , २०१६ ,२०१७, २०१८ आणि २०२१ या काळात बर्फवृष्टी झाली. अभ्यासक या पुढील काळातही सहारा वाळवंटात बर्फवृष्टी होवू शकते असं अभ्यासक म्हणतात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact