शिक्षका कॉर्नर
- फारूक काझी
( शिक्षक-लेखक)

काही दिवसांपूर्वी मी एका दहावीतील मुलाशी बोललो. तो खूप नाराज आणि उखडलेला होता. कारण त्याचं वेगळंच जग त्याच्या मनात तयार होत होतं आणि त्याचे आई बाबा त्याच्याकडून वेगळ्याच अपेक्षा करत होते. अशात त्याची फार मोठी अडचण झाली होती. तो अगदी गोंधळून गेला होता. मग नेमकं त्याचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही गप्पा मारल्या. तेव्हा तो भरभरून बोलला. तो एवढं बोलेल अशी त्याच्या आई बाबांचीही अपेक्षा नव्हती.
बोलता बोलता तो म्हणाला. 'सर मी एक ॲव्हरेज स्टुडंट आहे हो'. त्याच्या या एका वाक्याने माझं लक्ष वेधलं.मी थोडा विचार केला आणि त्याला म्हणालो, अरे ॲव्हरेज स्टुडंट असणं यात चूक काहीच नाही. जगातील बहुतांश लोकं ॲव्हरेजच असतात. पण मुद्दा हा आहे की आपण ॲव्हरेज बनून राहणं योग्य आहे का? त्यातून बाहेर पडण्यासाठी तू काय करणार? आणि तू स्वत:ला ॲव्हरेज का ठरवतोय इतर सर्व तुला ॲव्हरेज म्हणतात म्हणून?'
हेही वाचा!
कोणी आपल्याला सारखं नावंच ठेवत असेल, टीका करत असेल तर काय करायचं?
तुम्हाला समजलं का की मला काय म्हणायचं आहे ते? हवं तर अजून थोडं फोड करुन सांगतो. आपण स्वत:विषयी बरेच ग्रह करून घेतो. कधी ओव्हरकॉन्फिडन्ट होतो तर कधी प्रचंड न्यूनगंडानं ग्रस्त होतो. आपण असेच आहोत, आपण तसेच आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. बरं हे ठरवतं कोण?- तर इतर लोकंच. पण लोकांना आपण काय आहोत हे कुठे माहीती असतं? याचा अर्थ आपण सतत स्वत:ला दुसऱ्यांच्या चष्म्यातून बघत असतो. तेव्हा आता स्वत:ला जगाच्या नव्हे तर स्वत:च्या दृष्टीने आणि दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. म्हणजे आपलं चांगुलपण, आपल्या उणिवा आपल्याला दिसू लागतील. त्यांचा स्वीकार करून आणि त्यात सकारात्मक बदल करत पुढं जात राहायला हवं.
आपण कसे आहोत हेच आपल्याला कळत नाही. मग आपण कसे आहोत हे इतर लोक ठरवून मोकळे होतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण कोण आणि कसे आहोत याची मोजपट्टी दुसऱ्यांच्या हातात का द्यायची? आपण नाही का ठरवू शकत? खरंतर हे आपणच ठरवू शकतो. त्यामुळे आधी तुम्ही स्वत:ला ॲव्हरेज, मठ्ठ, सोसो असं काही समजत असाल तर आधी ते थांबवायला हवं! स्वत:कडे पाहा. आपल्यात काय चांगलं आहे आणि आपण कशावर काम करायला हवं ते ओळखा. आपल्यातल्या उणिवा दूर करण्यासाठी आपल्याला आई बाबा, शिक्षक, मित्रमैत्रीणी, आजी-आजोबा, भावंडं यापैकी आपली कोण मदत करु शकतं हे ओळखा आणि कामाला लागा. आपण इतरांनी लावलेल्या चष्म्यातून छान दिसतो की आपल्या नजरेतून याचं उत्तर तुमचं तुम्हाला नक्की मिळालं असेल.. हो ना?
farukskazi82@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


