- डाॅ. श्रुती पानसे
(मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)

'आम्ही जी परीक्षा देतो त्या परीक्षेमध्ये प्रश्न असतात. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. यावरून आमच्या शिक्षकांना नक्की काय समजतं?' काही मुला मुलींशी मनमोकळ्या गप्पा चालू होत्या तेव्हा परीक्षा या विषयावर काहीजण मला प्रश्न विचारत होते. त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते.
'तुम्हाला वर्षभरामध्ये जे काही शिकवलं त्यातलं तुम्हाला किती कळलं हे समजतं! 'मी म्हणाले.
'समजा मला 95% च्या वर मार्क मिळाले, ए प्लस ग्रेड मिळाली तर शिक्षकांना त्यातून काय समजतं की यावर्षी जे काही शिकवलं आहे ते मला समजलं आहे. लिहिता आलं आहे. पुढच्या वर्षी मला समजा पास होण्यापुरतेही मार्क मिळाले नाही तर त्यातून शिक्षकांना काय समजतं की वर्षभर मला जे काही शिकवलं त्यातलं मला काही समजलं नाही किंवा मला परीक्षेत लिहिता आलं नाही. या दोन गोष्टी त्यांना समजतात. असच ना?' एका मुलीनं असा खूपच लांबलचक पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला.
हो. परीक्षेपुरतं तरी तेवढेच म्हणावं लागतं की तुम्हाला अमुक एखादी गोष्ट समजली आणि काही गोष्टी तुम्हाला नाही समजल्या.'
तीच पुढे म्हणाली की 'पण मी माझ्या अभ्यासासाठी किती मेहनत घेतली हे त्यातून शिक्षकांना कळतं का?'
'म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय?'
हेही वाचा!
कसा अभ्यास केला म्हणजे परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील?
'मी माझं अक्षर सुधारण्यासाठी यावर्षी खूप प्रयत्न केला. पण त्याची दखल माझ्या उत्तर पत्रिकेतून घेतली जाईल का?'
तिचं ऐकून दुसरा मुलगा म्हणाला की, 'मी गणित चांगलं व्हावं म्हणून यावर्षी खूप प्रयत्न केला. मला आई-बाबांनी क्लास पण लावला पण मला मार्क कमीच मिळाले. याचा अर्थ काय की मी प्रयत्न केला तरी सुद्धा मला मार्क मिळाले नाहीत. मग मी हुशार नाही असा त्याचा अर्थ झाला. पण त्यासाठी मी किती प्रयत्न केले हे आमच्या उत्तर पत्रिकेवरून दिसूनच येत नाही.
आपण प्रयत्न करतो. क्लासला जातो. सराव पत्रिका सोडवतो. पण तरीसुद्धा मार्क मिळतातच असं नाही , याबद्दल आता मुलं निराश होत आहेत असं मला वाटत होतं.
' कदाचित याचा अर्थ आपली अभ्यासाची दिशा चुकते आहे असं होतंय का, हे तपासायला पाहिजे ,' मी म्हटलं.
'आमचे परीक्षेतले मार्क धरले जातात पण आम्ही इतरही काय काय शिकत असतो. सायकल शिकत असतो,पोहायला शिकत असतो त्याचे मार्क का नाही धरले जात?'
'खरंतर मी यावर्षी अभ्यास करण्याबरोबरच सायकल चालवायलाही शिकलो.'
'मी माझ्या आईच्या हाताखाली खूप पदार्थ करायला शिकलो.'
'मी बाबांबरोबर जाऊन त्यांची बँकेची काम ते कशी करतात हे बघून आलो.'

'हे सगळं तर शिक्षकांना कधीच कळणार नाही. मग फक्त शाळेतल्या मार्कांवरूनच आमची प्रगती ठरणार का?' आता हा प्रश्न माझ्या आवाक्याबाहेरचा होता. पण त्यांचा प्रश्न बरोबरच होता.
'बरोबर आहे. तुम्ही फक्त शाळेत येऊनच शिकत नाही तर तुम्ही अखंड शिकतच असता. तुम्ही घरी असताना शिकता, तुम्ही आई-बाबांबरोबर बाहेर गेला तर शिकता, तुम्ही मित्र मैत्रिणींबरोबर खेळत असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर जात असाल तरीही शिकता, हे सगळं शिकणच आहे, हे बरोबर आहे.'
'त्या प्रत्येक शिकण्याचं प्रतिबिंब शाळेच्या परीक्षांमध्ये दिलेल्या उत्तरातून कधी कधी येत नाही. आणि त्यामुळे तुमची विविध पातळीवर कशी प्रगती झाली आहे हे कदाचित शिक्षकांना समजतही नाही. पण ते शिक्षकांना समजत नाही म्हणून तुम्ही नाउमेद व्हायचं कारण नाही. उलट तुमची अशी प्रगती वेळोवेळी शिक्षकांना कळवत राहायला हवी. आता समजा कोणाचा संगीताच्या स्पर्धेत ,नृत्य स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत पहिला - दुसरा नंबर आला किंवा नंबर आला नाही पण एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला हे सुद्धा खरंतर खूप जास्त महत्त्वाचं आहे.
आपण अभ्यासाव्यतिरिक्त इतरही खूप काय काय छान केलं, शिकलो हे शाळेला कळत नाही म्हणून निराश व्हायचं नाही. यावर्षी तुम्ही अवांतर किती पुस्तक वाचली ,मराठी - हिंदी - इंग्लिश पुस्तकं किती वाचली? तुमच्या वस्ती पातळीवर किंवा सोसायटीमध्ये एखादा कार्यक्रम घेतला तर त्यामध्ये निवेदन केलं असेल, याही गोष्टी शिक्षकांपर्यंत अवश्य पोहोचायला हव्यात. तर तुमची सर्वांगीण प्रगती कशी होते आहे हे शिक्षकांनाही कळेल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


