मी कधीकधी काहीही न करता शांत बसून राहाते. मला चांगलं वाटतं. पण घरचे लगेच रिकामीच का बसलीये म्हणून ओरडतात, कामाला लावतात. रिकामं बसून राहाण्यात काय प्राॅब्लेम आहे? - प्राची हातोले, अमरावती

काही न करता शांत बसून राहाणं यात तसं म्हणशील तर चूक काही नाही. आपण सतत काही तरी करतच राहायला हवं, सतत बिझी असायलाच हवं असं नाही, कधीतरी आपल्या डोक्याला, शरीराला शांतता मिळणंही आवश्यक असतं. तुला गंमत माहितीये का? अगदी आपल्याला कंटाळा येणं हेही आपल्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे तुला छान वाटतं ना शांत बसायला? मग त्यात हरकत काही नाही. पण अगं, घरातली लहान मुलं सतत दंगा-धुडगुस घालत असली की ती नीट आहेत असं मोठ्या माणसांना वाटतं. अगदी दंगा-धुडगुस घातला म्हणून मोठे लोक तुम्हाला रागावत असले तरी त्यांना माहिती असतं तुम्ही दंगा-धुडगुस घालताय म्हणजे तुम्ही ठीक आहात, नॉर्मल आहात! तू शांत बसतेस ते तुला आवडतं, छान वाटतं म्हणून, पण आईबाबांना कदाचित तुला शांत बसलेलं बघून काळजी वाटत असेल... तुझं काही बिनसलंय का, तुला कुणी काही बोललंय का, तुला काही दुखतंय का असे प्रश्न त्यांना पडत असतील, तसं थेट विचारलं तर तुला राग येईल म्हणून ते तुला कामाला लावत असतील किंवा रिकामी बसू नकोस म्हणत असतील...
आता यावर उपाय काय? तू एक काम कर... पुन्हा कधी तुला काही न करता शांत बसावंसं वाटेल तेव्हा सरळ आईबाबांना सांग, मला ना जरा कंटाळा आलाय, काही न करता शांत बसावंसं वाटतंय, मला काही होत नाहीये, मला कुणी काही बोललं नाहीये, त्यामुळे तुम्ही काळजी करु नका, मी अशीच जरावेळ शांत बसते आहे... तुमचं काही काम असेल तेव्हा हाक मारा, मी येईन!
हे असं सांगितलंस की आईबाबा काळजी करणार नाहीत आणि ओरडणारही नाहीत, बघ बरं ही ट्रिक वापरुन... आणि ही ट्रिक वापरल्यावर काय झालं ते कळव आम्हाला नक्की!


