मुलांना फक्त मित्र असतात आणि मुलींना फक्त मैत्रिणीच. हे कोणी ठरवलं?

 

तर आपल्या वयाच्या मुलामुलींशी जरूर बोलावं. गप्पा माराव्यात. त्यांच्याशी खेळावं. आपल्या वयाच्या इतर मुलामुलींशी छान मैत्री करावी. कारण हे वय मैत्री करण्याचं असतं. आणि छान मैत्री करता येणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. का माहितीये? कारण तुम्ही ज्याला ‘जोडी’ म्हणता, ते जे नातं मोठ्या माणसांमध्ये असतं ना, त्यातसुद्धा सगळ्यात आधी मैत्री असते.

खरं वाटत नाही ना? पण जरा स्वतःशी विचार केलात तर तुमच्याही लक्षात येईल की आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपुलकी वाटते, काळजी वाटते, तिला मदत करावीशी वाटते आणि हेच समोरच्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल वाटतं तेव्हा आपली तिच्याशी छान मैत्री होऊ शकते. एखादा मुलगा आपला मित्र असतो किंवा एखादी मुलगी आपली मैत्रीण असते म्हणजे नेमकं काय असतं? आपण त्याच्यासाठी किंवा ती आपल्यासाठी काय काय करते?

तर शाळा बुडाली असेल तर अभ्यासाच्या वह्या देते. गृहपाठ पूर्ण करायला मदत करतो. आपण घरी न सांगता शाळा बुडवण्याचा उद्योग केला असेल, तर आपण पकडले जाऊ नये म्हणून मित्र मदत करतो. आणि समजा पकडले गेलो तर? आपला मित्र / मैत्रीण काय करते? सर / मॅडम / आई / वडिलांना सांगतो, “मॅडम तो खरंच जाणार नव्हता. तो मला बोलला होता. त्या बाकीच्या पोरांनी बळजबरी नेला त्याला.” आणि आपली शिक्षा कमी करून घेतल्याच्या नंतर मग हाच मित्र आपल्यालाही चांगला रागावतो. “तू कशाला जातो रे त्या पोरांच्यात? ते नापास झालेत. तूपण नापास होशील.” आपण शाळेत जातांना छत्री विसरलो तर आपली मैत्रीण आपल्याला तिच्या छत्रीत घेते. दोघींचा एक-एक खांदा भिजला तरी तिला चालतं. आपल्याला जर का आई किंवा वडील उगाच रागवले असतील तर आपण ते बिनधास्त आपल्या मैत्रिणीला सांगू शकतो. ती आपलं सगळं म्हणणं ऐकून घेते पण आपल्याला आईच्या विरुद्ध काही शिकवत नाही. शेवटी ती म्हणते, “जाऊ दे. आईच बोलली ना. तू पण किती भांडतेस मावशीशी.”

हेही वाचा!

कोणाचंही ‘बेस्ट फ्रेंड’ होण्याचं सिक्रेट काय?

image : brgfx

आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर अश्या धमाल गोष्टी करू शकतो ज्या इतर कोणाहीबरोबर करता येत नाहीत. सायकल चालवायची, पोहायला जायचं, डोंगरावर जायचं, गावातल्या वेगवेगळ्या मंदिरात जाऊन पुन्हा पुन्हा प्रसाद मागून खायचा, नवीन गाणी ऐकायची असं सगळं करायला आपल्याला मित्रमैत्रिणी लागतात. आणि ते मुलांनाही लागतात आणि मुलींनाही लागतात. मग हे सगळं आपण ज्याच्याबरोबर / जिच्याबरोबर करू शकतो तो मित्र असला किंवा मैत्रीण असली तर त्याने काय फरक पडतो? मुलांना फक्त मित्र असतात आणि मुलींना फक्त मैत्रिणी असतात हे कोणी ठरवलं? मुलींनाही मित्र असू शकतात आणि मुलांनाही मैत्रिणी असू शकतात. कारण मैत्री ही मैत्री असते. आणि या वयात फक्त मैत्रीच खरी असते. तिला ‘जोडी’चं नाव दिल्याने जोडी तर होत नाहीच, पण असलेली मैत्री पण बिघडून जाते.

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact