
मी अजून शाळेतच आहे. पण मला एक मुलगा आवडतो. हे असं मला कोणी आवडत असेल तर मला कोणी नावं ठेवेल का? शाळेत असताना असं कोणी तरी आवडणं चुकीचं असतं का?- अक्षरा
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शाळेत आहे आणि या वयात मला कोणीतरी आवडतं म्हणजे ही मोठी चूक वगैरे आहे हे आधी डोक्यातून काढून टाक. मुळात तू ज्या वयात आहेस त्या वयातल्या अनेक मुला मुलींच्या मनात असं विरुध्द लिंगी आकर्षण निर्माण होतं. हा वाढीच्या काळातला आपल्या शारीरिक मानसिक बदलाचा परिणाम आहे. हे असं वाटतं म्हणून स्वत:ला अपराधी मानून न घेता तू हे का होतंय हे समजून घे.
- तुला कोणीतरी आवडतं हे विचारांच्या पातळीवरचं आहे ना. एखाद्या गोष्टीचा विचार येणं, कोणीतरी आवडणं यात चुकीचं काहीच नाही. मला सांग तुला शाहरुख, आमिर खान, विकी कौशल, ह्रतिक रोशन किंवा विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल यासारख्या स्टार मंडळीपैकी कोणीतरी नक्कीच आवडत असेल ना. हे आपल्याला आवडतात म्हणून कोणी आपल्याला नावं ठेवतं का? नाही ना! तसंच आहे हे. अभिनेता, खेळाडू आवडण्यात जसं काही चूक नाही तसंच तुला आत्ता तुझ्या वर्गातलं कोणी आवडत असेल तर तसं त्या आवडण्यातही काही चूक नाही.
- पण अमूक एक मुलगा आवडतो या विचारांमध्ये वाहून जाऊ नकोस. म्हणजे सतत त्याचाच विचार करत बसू नकोस. कारण हे जर तू केलं तर ते चुकीचं ठरेल. कारण तू ज्या वयात आहे त्या वयात सारासार विचार करण्याची ताकद नसते. त्यामुळे आपल्याला एखादी व्यक्ती आवडते म्हणजे नक्की काय आवडतं, त्या व्यक्तीचे विचार, वागणं तपासून बघणं या गोष्टी या वयात होत नाही. आणि मुळात या गोष्टी या वयात करायच्याही नसतात. त्यामुळे विचार येतात तर ते येवू द्यावेत. तू तुझं लक्ष अभ्यास, खेळ, छंद, वाचन याकडे वळव. त्याच विचारात अडकून राहू नकोस.
- आपल्याला ज्या मुली आवडतात, ज्यांच्याशी आपलं चांगलं पटतं त्यांच्याशी आपण मैत्री करतो. तशी मैत्री तू तुला आवडणाऱ्या मुलाशीही करु शकते. फक्त ती मैत्री करताना बाकीचे इतर विचार डोक्यातून काढून टाक.
- नावं ठेवणं म्हणजे टीका करणं. कोणी आपल्याला नावं ठेवेल अशी जी तुला भीती वाटतेय ते केव्हा होईल? - जेव्हा नको त्या वयात तू नको त्या गोष्टी करशील तेव्हा. मुळात आत्ता तू ज्या वयात आहे ते वय म्हणजे मुलं मुली असा भेद न करता निखळ मैत्री करण्याचं आहे. अभ्यास, खेळ, छंद, कला यात रमण्याचं आहे. या गोष्टींचा मनमुराद आनंद घे. त्यातून तुझं व्यक्तिमत्व घडणार आहे. वयानुरुप तुझी समज वाढेल. सारासार विचार करण्याची क्षमता वाढेल, काय योग्य काय अयोग्य हे ठरवण्याची तुझी निर्णयक्षमता विकसित होईल. व्यक्तींची निवड करण्याची, त्यांची पारख करण्याची नजर तुला प्राप्त होईल. त्यामुळे कोणीतरी आपल्याला आवडतंय म्हणून त्यात अडकून राहण्याची घाई करु नकोस. आणि शाळकरी वयात मला कोणीतरी आवडतं म्हणून त्यात स्वत:ला दोषही देत बसू नकोस. या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर.
- आत्ता त्या विशिष्ट मुलाबद्दल तुझ्या मनात येत असलेल्या विचारांमधून तुला बाहेर पडता येत नसेल तर आई बाबांशी बोल, त्यांची मदत घे. आणि मस्त आनंदी राहा!
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


