मुलींपेक्षा माझी मुलांशी मैत्री जास्त आहे. यात चूक काय?

Image: freepik

मला एकही मुलगी बेस्ट फ्रेण्ड नाही. पण दोन मुलं माझे मित्र आहेत. मी त्यांच्याशी बोलते. पण वर्गातल्या मुली वेगळाच अर्थ काढतात. मी काय करु?

- मुलगे आणि मुली अगदी छान घट्ट मित्र मैत्रिणी असू शकतात, काय म्हणालीस तू? बेस्ट फ्रेंड्स, हो ना? तर, मुलगे आणि मुलगी अगदी शंभर टक्के बेस्ट फ्रेंड्स असू शकतात. इतरांना वाटतं तसं वेगळं त्यांच्या मैत्रीत काहीही नसतं, नसू शकतं.

- वर्गातल्या मुली किंवा इतर लोक त्या मैत्रीचा काय अर्थ काढतात, हे तुझ्या हातात नाही. कुणाच्याच हातात नाही, पण मुलगे आणि मुली यांची छान शुद्ध निखळ मैत्री नक्की असू शकते आणि त्यात अजिबात काही गैर नाही. अर्थात हे सगळ्यांनाच कळतं किंवा पटतं असं नाही. पण तरी तुला महत्त्वाचं वाटत असेल तर त्यांना ते कळावं असा प्रयत्न तू करु शकतेस.

- म्हणजे बघ, त्या दोन मुलांशी तुझी मैत्री का आहे आणि इतर मुलींशी का नाही हे मुद्दाम समजावल्यासारखं न करता कधी तरी सहज त्यांना समजावू शकतेस तू, बघ बरं ऐसा प्रयत्न करुन. म्हणजे उदाहरणार्थ, तू एखादं पुस्तक विसरलीस आणि तुझ्या वर्गातल्या इतर कुणाच्याही आधी त्या दोन मित्रांपैकी एखाद्याने त्या विषयाच्या तासाला त्याचं पुस्तक तुला दिलं हे कारण असेल किंवा तुझ्या आवडीचा खाऊ त्यांच्या डब्यात असताना आठवणीने त्यांनी तो तुझ्यासाठी ठेवला म्हणूनही तुला ते दोघे तुझे बेस्ट फ्रेंड वाटत असतील…

- ती कारणं फक्त तुला आणि तुझ्या त्या दोन मित्रांनाच माहिती असतील. तुझ्या मैत्रिणींना ती कारणं समजलीत तर अशा छोट्या छोट्या छान गोष्टी करायला त्या ही तुम्हा तिघांकडून शिकतील, त्यामुळे तुमची सगळ्यांचीच एकमेकांशी छान मैत्री होईल आणि त्या तुमच्या मैत्रीचा वेगळा अर्थ काढणार नाहीत… हो ना? तुला काय वाटतं? बघ बरं प्रयत्न करुन!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact