प्रश्नपत्रिका हातात पडली पण काही आठवतच नसेल तर काय करायचं ?

- डाॅ. श्रुती पानसे

Image: hindustantimes

परीक्षा ही गोष्टच अशी असते की ज्याचा ताण येणं अत्यंत स्वाभाविक आहे. कोणत्याही वयात परीक्षा द्यायची असेल आणि ती कोणत्याही विषयाची परीक्षा असली तरीसुद्धा ताण येणं स्वाभाविक असतं. प्रत्येक परीक्षेचा ताण येतो मात्र ताण जर प्रमाणात असेल तर आपल्या हातून अतिशय उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते. ताण आहे म्हणून तर आपण अभ्यास करतो, ताण आहे म्हणूनच तर आपण चांगलं अक्षर काढतो, पेपर नीटनेटका देतो.

पण ज्या वेळेला हे ताणाचं प्रमाण वाढतं त्यावेळेला त्याचा परिणाम निओ कॉर्टेक्सवर म्हणजे विचार करणाऱ्या केंद्रांवर होतो . म्हणून मेंदूला काही सुचेनासं होतं. त्यामुळे पेपरमध्ये काहीही येत नसेल तरीसुद्धा ताण न घेण्याचं कौशल्य हे आपल्याला शिकून घ्यावं लागेल. समजा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आपण असं म्हणू की प्रश्नपत्रिका हातात पडली आणि त्यातलं काहीही ओळखीचं वाटत नाही तर काय करता येईल?

हेही वाचा!

ब्लॅंक झालं तर करा 3 गोष्टी

सर्वप्रथम अशा वेळेला एक घोटभर पाणी प्यावं. डोळे बंद करून किंवा डोळे उघडे ठेवून दीर्घ श्वसन करावं. यातून मेंदूला ऑक्सिजन मिळतो. ताण असलेल्या मेंदूला थोडं हलकं वाटतं. मेंदूला ऑक्सिजन मिळणं म्हणजेच मेंदूच्या विविध केंद्रांना ऑक्सिजन मिळणे.

हीच प्रश्नपत्रिका सोडवायची आहे हे लक्षात घ्या. दुसरी प्रश्नपत्रिका मिळणार नाही. त्यामुळे जे काही लिहायचं आहे आणि जे काही आपण चांगलं लिहू शकतो ते याच प्रश्नपत्रिकेच्या आधारावर लिहायचं आहे हे मनाला एकदा निक्षून सांगा.

एवढं केलं तरी तुम्हाला कितीतरी गोष्टी सुचायला लागतील. प्रश्न ओळखीचे वाटायला लागतील. समजा अभ्यास नीट झालेला नसला, तरीसुद्धा जेव्हा वर्गात हा विषय शिक्षक शिकवत होते तेव्हाचं काही आठवतंय का किंवा आपण गृहपाठ केला होता तेव्हाच काही आठवतंय का, आपण धडे वाचले होते तेव्हा या प्रश्नाचा काही संदर्भ आला होता का, हे सगळं चाचपडून बघाल तेव्हा तुम्हाला नक्की काही ना काही धागेदोरे सापडतील. त्यानुसार उत्तरं लिहायला सुरुवात करायला हवी.

प्रत्येक वेळेला अजिबातच आठवणार नाही असं होत नाही. पण त्यासाठी आपला मेंदू शांत करण्याची गरज असते. ‘अरे बापरे! मला काहीच येत नाही. आता मी काय करणार? मी नापास होणार!!’ असली वाक्य मनातसुद्धा आणू नका. त्या ऐवजी ‘जे काही मला आठवत आहे, ते मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे इथे लिहुन दाखवेन’ असं वाक्य मनाशी म्हणा. मेंदूला शांत केलं तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं सुचतील आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ती उत्तरपत्रिकेत लिहिता येतील.

( लेखिका 'अक्रोड' उपक्रमाच्या संचालक आहेत.)

shruti.akrodcourses@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact