खिशात काॅपी आणि मनात भीती. मग पेपर चांगला कसा जाणार?

डाॅ. श्रुती पानसे

पुरेसा अभ्यास झालेला नाही ही मानसिकता जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची असते याचं कारण धड्यांमध्ये लिहिलेला अभ्यास आणि  आपण केलेला अभ्यास, त्यातून आपल्याला समजलेला अभ्यास यामध्ये कायमच थोडी का होईना तफावत असणारच आहे. धडेच्या धडे तोंडपाठ होऊ  शकत नाहीत.  म्हणून तर जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.  जे लक्षात राहील त्या आधारावर परीक्षा द्यायची असते. त्यामुळे समजा आपल्याला परीक्षेत कमी मार्क मिळाले, परीक्षेत नापास झालो तर पालक ओरडतील, शिक्षक रागावतील, याचं टेन्शन असतं. म्हणून मुलं कॉपी करण्याचा विचार करतात. 

 इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शिक्षक किंवा पालक यांच्यासाठी आपण  शिकत नाही, त्यांच्यासाठी परीक्षा देत नाही तर स्वत: साठी अभ्यास करतो. स्वत: साठी परीक्षा द्यायची असते. इतर कोणासाठी आपण हे करत नाही. 

 

हेही वाचा!

परीक्षेत वेळ पुरण्यासाठी अभ्यास कसा करायचा?

 यापेक्षा दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलाने किंवा मुलीने कंपासमध्ये, बुटामध्ये एखादी चिठ्ठी ठेवलेली असते, हातावर कोपरावर काहीतरी लिहिलेलं असतं त्यावेळेला यातलं काही  पकडलं जाऊ नये याची खूप मोठी भीती मनामध्ये असते आणि आपल्याला माहितीच आहे की ज्या वेळेला आपल्या मनात कोणतीही भीती असते तेव्हा ती चेहऱ्यावर दिसत असते. 

वरवर काहीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शिक्षक हे आपल्यापेक्षा जास्त मोठे असतात, अनुभवी असतात. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे चेहरे खूप पटकन वाचू शकतात. विद्यार्थ्यांचे चेहरे वाचण्याचं कौशल्य प्रत्येक शिक्षकात  असतंच. त्यामुळे कितीही आव आणला, अभिनय केला तरी सुद्धा शिक्षकांना हे समजतं. 

समजा आपल्याला पेपर सोपा आला, आपण जो अभ्यास केला होता त्यावरचे  प्रश्न आले, असं झालं तर आपल्याला त्या कॉपीच्या कागदाचा काहीही उपयोग नाही. आपण वेगात आणि आनंदात, सहजपणे  पेपर लिहू शकतो. पण केवळ तो कॉपीचा कागद आपल्याजवळ आहे, याचा ताण आणि भीती मनात असते. त्यामुळे धड तो पेपर लिहिण्याकडे सुद्धा आपलं लक्ष लागत नाही. 

ही स्थिती तर अत्यंत वाईट आहे. कॉपी पकडली गेली तर होणारी शिक्षा हा एक वेगळाच मुद्दा आहे. पण आपण कॉपीचा कागद जवळ ठेवल्यावर स्वतःलाच  शिक्षा करून घेतो आहोत, हे लक्षात घ्यायला हवं.  

म्हणून जो काही अभ्यास झाला आहे तो आपल्या डोक्यात असला पाहिजे. तो कुठेही कागदावर, हातावर, हाताच्या कोपऱ्यावर, परीक्षेच्या पॅडच्यावर लिहिण्याची काहीही गरज नाही. हे म्हणजे स्वतःलाच फसवण्यासारखं आहे. शांत मनाने पेपर लिहिण्यापेक्षा भीती आणि ताणाखाली पेपर लिहिला तर तो कसा लिहिला जाईल याचे उत्तर तुमच्याकडे आहेच. 

लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.

shruti.akrodcourses@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 9112050500
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact