
मी रात्री नऊ वाजता झोपलो तरी मला सकाळी दहा वाजताच जाग येते. घरातले ओरडतात किती झोपतो म्हणून. कितीही ठरवलं तरी सकाळी लवकर जागच येत नाही. लवकर उठण्यासाठी मी काय करायला हवं?
- योगेश गुंजाळ, नाशिक
आपण आपल्या शरीराला जी सवय लावू तसं ते वागतं. त्यामुळे लवकर उठण्यासाठी स्वतःच्या शरीराला तशी सवय लावून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. चांगल्या सवयी लावून घेणं असो किंवा वाईट सवयी सोडणं असो या सवयी आपोआप लागत नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तसे ते तुला लवकर उठण्याच्या बाबतीत करावे लागणार आहेत.
आणि फक्त लवकर उठण्यासाठीच कशाला? लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लाभे असं म्हणतात हे तू ऐकलं आहेस का? तू लवकर झोपतो आहेसच, त्यामुळे आता तुला फक्त लवकर उठण्याची सवय लावून घ्यायची आहे. त्यासाठी काही दिवस गजराचं घड्याळ म्हणजे अलार्म क्लॅाक वापरुन बघतोस का? अलार्म वाजला की आपोआप तुला जाग येईल. काही दिवस ही शिस्त पाळलीस की आपोआप अगदी अलार्म शिवायही तुझ्या शरीराला सवय झाल्यामुळे लवकर जाग येईल.
तुला जागच येत नाही म्हणजे तू खूप दमतोस का? त्यामुळेही खूप झोप येऊ शकते. तुला खूप दमायला होत असेल तर ज्या गोष्टींमुळे तुला दमायला होतंय त्या गोष्टी थोड्या कमी करुन बघ. आईबाबा आजीआजोबा तुला सकाळी उठवायचा प्रयत्न करतात ना? तेव्हा त्यांच्यावर न चिडता उठत जा. त्यामुळेही अनावश्यक झोपून राहाणं कमी होईल.
आत्ता शाळेला सुट्टी आहे तोपर्यंत तू आणखी एखादा प्रयोग करु शकतोस. सकाळी उठल्यावर चालायला जायचं, व्यायाम करायचा किंवा एखादी खूप इंटरेस्टिंग गोष्ट करायची असं काहीतरी ‘गोल’ ठेव स्वत:समोर. म्हणजे तुला त्यामुळे लवकर जाग येईल. शाळेची सहल असते तेव्हा कशी भल्या पहाटे जाग येते? तसंच… याशिवायही तुला काही नवीन सुचलं तर तू काय काय उपाय केलेस ते आम्हाला नक्की कळव!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


