मोबाइलशिवाय एक मिनिटही करमत नसेल तर काय करावं?

Image: freepik

आईबाबा आणि माझं सध्या मोबाइलमुळे सारखं भांडण होतं. मी मोबाइल हाताता घेतला की ते ओरडतात, तरी मला मोबाइलशिवाय एक मिनिटही करमत नाही… अभ्यास करताना, खेळतानाही हातात सतत मोबाईल असायलाच हवा असं वाटतं, असं का होतं, मी काय करु? -ज्योत्सना

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असं आपले आजीआजोबा सांगतात, तू ऐकलं आहेस का हे कधी? मोबाइलच्या बाबतीत किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या बाबतीतही हे लागू पडतं. म्हणजे उदाहरणार्थ तुला गाजर आवडतं म्हणून तू सतत फक्त गाजरच खात राहिलास आणि इतर काही खाल्लच नाहीस तर चालेल का? नाही ना? तसंच मोबाइलचं आहे. मोबाइल ही गोष्ट सोयीची आहे, तिच्याकडे सोय आणि संवादाचं साधन म्हणूनच बघितलं जायला हवं. आईबाबा तुला मोबाइलमुळे ओरडत असतील तर त्यात त्यांचं काही चुकतंय असं मला वाटत नाही.

आपल्या सुट्टीच्या पानावरचे श्रुती मावशीचे लेख तू वाचतेस का? वाचले नसशील तर शोधून नक्की वाच आत्ता लगेच. सतत मोबाइलवर गेम खेळणं, सतत मोबाइल हातात हवाच असं वाटणं हे काही बरोबर नाही. तू अजून लहान आहेस. खेळताना, छानछान पुस्तकं वाचताना, दंगामस्ती करताना तुला आजुबाजुच्या जगाचा विसर पडायला हवा,

मोबाइलची आठवण येता नये… पण तुला मात्र ती येते, म्हणजे तुला तुझ्या सवयी बदलायची गरज आहे. त्यासाठी आईबाबांचं ऐक. आईबाबा सगळंच आपल्याला ओरडायचं म्हणून सांगत नाहीत, त्यात ते आपल्या हिताचाच विचार करतात हे नक्की लक्षात ठेव.

सतत मोबाइल बघणं हे तुझ्या डोळ्यांसाठी, मेंदूसाठीही अजिबात चांगलं नाही. मेंदूला काय आवडतं आणि काय आवडत नाही याबद्दल श्रुती मावशीने लिहिलंय ते नक्की वाच आणि तसं वागायचा प्रयत्न कर… कुठलीही सवय हळूहळूच जाते. रोज थोडंथोडं करुन मोबाइल वापर कमी केलास की इतर चांगल्या गोष्टींमध्ये तुझं लक्ष लागेल आणि तुलाच छान वाटेल…

मी सांगितलेलं, श्रुती मावशीच्या लेखांमध्ये लिहिलेलं तुला पटलं का? मोबाइलची सवय कमी करायला तू काय काय केलंस? त्यासाठी आईबाबांची तुला कशी मदत झाली? मला नक्की कळव, मी वाट बघते.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact