
आत्मविश्वास म्हणजे काय? तो कसा निर्माण करावा?
- धनुष बडोदे, इयत्ता 7 वी, पायोनिअर इंटरनॅशनल हास्कूल, भोकरदन
आपल्याला सांगितलेलं एखादं काम, आपल्यावर आलेली एखादी छोटीशी जबाबदारी आपण व्यवस्थित पूर्ण करु शकतो असं स्वतःला वाटणं म्हणजे आपला आत्मविश्वास. सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे ना तुला? मग आईबाबांनी जर तुला सांगितलं, की आज आजीला डॉक्टरांकडे जायचं आहे आणि आम्हाला सुट्टी नाही, तू फक्त आजीबरोबर जा आणि आजीचं डॉक्टरांना भेटून झालं की दोघं नीट रिक्षाने परत या.. आणि जर का तुला या जबाबदारीची अजिबात भीती वाटली नाही, तू सहज आईबाबांना म्हटलंस की चालेल, मी जाईन आजीबरोबर, तुम्ही काळजी करु नका, तर याचा अर्थ तू आजीबरोबर व्यवस्थित जाऊन येशील आणि जाता-येताना आजीला काही छोटीशी मदत लागली तर ती करु शकशील हा आत्मविश्वास तुला स्वतःबद्दल वाटला असा त्याचा अर्थ.
शाळेत टीचर म्हणाल्या, आज मी गणिताची सरप्राईज टेस्ट घेणार आहे, आणि तुला वाटलं, ओके चालेल, मला जमेल सरप्राईज टेस्ट पास होणं, तर याचा अर्थ तुझ्याकडे त्या टेस्टला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास आहे.
आत्मविश्वास निर्माण कसा करायचा याचं उत्तर तुला जरा ट्रिकी वाटेल, कारण आत्मविश्वास एका रात्रीत निर्माण होणारी गोष्ट नसते. तू शाळेत करत असलेला अभ्यास, आजूबाजूच्या जगाचं तू करत असलेलं निरिक्षण, अवांतर वाचन अशा अनेक गोष्टींमधून तुझा आत्मविश्वास निर्माण होणार आहे आणि वाढणार आहे. एखादी गोष्ट मी करुच शकणार नाही अशी भीती मनात ठेवण्यापेक्षा मी करुन बघतो, जमलं तर मस्तच, नाही जमलं तर मी शिकेन काही तरी असा विचार केलास आणि त्याप्रमाणे कृती केलीस तर हळूहळू तुझ्यात आत्मविश्वास निर्माण होईल.
पण हो, आत्मविश्वास आणि अती आत्मविश्वास या दोन गोष्टी वेगळ्या, कॉन्फिडन्स हवा पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. आपला आत्मविश्वास दाखवण्याच्या नादात आपण भलतंच काही तरी करायचं नाही हे लक्षात असू दे, कळलं ना?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


