
खिडकीतून बाहेर बघा. आत्ता तुम्हाला काय दिसतं आहे? ऊन पडलंय का? ढग आलेत का?
गार वारा सुटलाय का?
तुम्हाला आत्ता खिडकीच्या बाहेर जे काही दिसत असेल ते “आजचं वातावरण” आहे. वातावरण हे तात्पुरतं असतं. आपण सहज म्हणतो, “आजचं वातावरण छान आहे.” किंवा “आजचं वातावरण ढगाळ आहे.”
पण हवामान मात्र मोठ्या कालावधीसाठी असतं. एखाद्या प्रदेशात ३० वर्षं किंवा त्याहून अधिक काळ सतत असणारं वातावरण म्हणजे हवामान असं आपण म्हणून शकतो. बदलत्या हवामानाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज बांधता येऊ शकतो. कारण आपल्यासारख्या देशात हवामान या गोष्टीवर शेती आणि पर्यायाने आपलं सगळ्यांचं आयुष्य अवलंबून आहे.
हेही वाचा!
हवामानाचं डोकं फिरलं आहे हे सगळ्यात पहिले कुणाच्या आणि कधी लक्षात आलं?
पाऊस किती पडेल? कमी का जास्त? कधी पडेल? नद्यांना पूर येतील का? दुष्काळ पडेल का? उष्णतेची लाट येईल का? खूप थंडी पडेल का? का अजिबात थंडी पडणार नाही? यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरं क्लायमेट चेंजच्या अभ्यासातून देता येऊ शकतात. हा अभ्यास सध्या जगभर सगळीकडे सुरु आहे.
कारण हवामानबदलाचे माणसावर आणि इतरही पशुपक्ष्यांवर होणारे परिणाम फार भयंकर असू शकतात. एखाद्या वर्षी थंडी पडली नाही तर त्या वर्षी आपल्या आयुष्यात फार फरक पडत नाही. पण थंडी कमी, म्हणजे बर्फ कमी, बर्फ कमी म्हणजे नदीला पाणी कमी, शेतीला पाणी कमी, शेतीचं उत्पादन कमी, म्हणजे भाववाढ, महागाई असे अनेक मुद्दे एकमेकांशी जोडलेले असतात. आणि त्यामुळेच हवामानबदलाचा अभ्यास करणं महत्वाचं ठरतं.
ढग, नद्या, समुद्र, वाळवंट या सगळ्यांचं निरीक्षण करून हवामानबदलाचा अभ्यास करता येतो. हा अभ्यास प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊनही केला जातो. तर काही वेळा हा अभ्यास उपग्रहांच्या मदतीने केला जातो.
आत्ता जगभरात सगळीकडे सुरु असलेल्या अभ्यासातून असं दिसून येतं, की जगात सगळीकडेच हवामानबदल किंवा क्लायमेट चेंज होतांना दिसतो आहे.
काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


