फळं आणि ड्रायफ्रूट्स यातलं आरोग्यासाठी काय चांगलं ?

Image: freepik

आपल्या शरीरासाठी फळं चांगली की ड्रायफूट चांगले? मी काय जास्त खायला हवं?

- पार्थ माने, कै. वि. मेहता माध्यमिक शाळा, सोलापूर

- चांगल्या आरोग्यासाठी चौरस आहार महत्त्वाचा असतो हे तू शाळेत विज्ञानाच्या तासाला ऐकलंच असशील. किंवा आजारी पडल्यानंतर डाॅक्टरांकडे गेल्यावर तर हे ऐकावंच लागतं. आपल्याला पोळी-भाजी-वरण-भातापेक्षा वडे, समोसे, वेफर्स, फिंगर चिप्स टाइप्स फास्ट फूडच जास्त आवडत असतं. आणि डाॅक्टर आणि घरी आल्यावर आई-आजी आपल्याला चौरस आहाराचं महत्त्व सांगत असतात. आपल्याला खायला भलेही काही आवडत असेल पण आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं तर चौरस आहारच महत्त्वाचा असतो हेच खरं. आता चौरस आहार म्हटलं की त्यात दूध, भाज्या, कडधान्य असं सगळंच आलं. फळं आणि ड्रायफ्रूट्स असं सगळंच आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. पण फळं आणि ड्रायफ्रूटस यातलं एकच काही तरी चांगलं असं मात्र कधीच नसतं.

- दोन्ही गोष्टी आपल्या नियमित आहारात असणं महत्त्वाचं आहे. तुला ड्रायफ्रूट्स खूप आवडतात म्हणून तू फळं खाल्ली नाहीस किंवा फळं खूप आवडतात म्हणून ड्रायफ्रूट्स खाल्ली नाहीस तर ते बरोबर नाही. त्या त्या ऋतूत मिळणारी रसदार ताजी फळंही आपण खायला हवीत आणि ड्रायफ्रूट्सही आपण थोडे थोडे खायला हवेत.

- फळांमधून आपल्याला भरपूर जीवनसत्त्व मिळतात. फळं शक्यतो ताजी कापून चावून खाल्ली तर त्यातून भरपूर फायबर्स मिळतात. त्यामुळे आपलं पचन चांगलं होतं. पचन चांगलं असलं की पोट व्यवस्थित राहातं. पोट व्यवस्थित म्हणजे आजारपण कमी! तर ड्रायफ्रूट्स शक्तिवर्धक असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणूनच दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात नियमित खाणं योग्य.

- फळं खायचा कंटाळा येतो म्हणून त्याचा ज्यूस करुन प्यायचा नाही. कारण ज्यूस केला तर फळांमधले फायबर्स पोटात जात नाहीत. फळं असो की ड्रायफ्रूट्स, आवडतात म्हणून अति खायची नाहीत हेही लक्षात ठेव.

- आणि महत्त्वाचं म्हणजे फळं आणि ड्रायफूटस यासोबतच सर्व प्रकारच्या भाज्या खाणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact