मला हातात सतत मोबाइल लागतो. मला ही सवय सोडायचीये, पण कशी?

 

Image: freepik

मला मोबाइलचे व्यसन लागलं आहे मी काय करु?- आर्यन

- आपल्याला मोबाइलचं व्यसन लागलं आहे हे कोणी दुसऱ्यांनी तुला सांगण्याआधी तू स्वत:च हे मान्य केलंस यासाठी तुला शाबासकी द्यायला हवी. कोणतंही व्यसन हे एकदम सुटत नाही. त्यावर सतत काम केलं, ते सुटण्यासाठी नियमित आणि मनापासून प्रयत्न केले की ते टप्याटप्याने सुटतं. मोबाइलचं व्यसनही याच पध्दतीने प्रयत्न केल्यास सुटेल.

- वेळ असला की घे हातात मोबाइल, अभ्यास वगैरे बाजूला ठेवून सतत मोबाइलच पाहात राहाणं ही सवय वाईटच. ही सवय सोडायची तर मोबाइल कमी वापरायला हवा. मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी तो बघण्याच्या विशिष्ट वेळा ठरवून घ्यायला हव्यात. आधी फोन वापरण्यावर आपण बंधनं घालायला हवीत. स्वत:लाच मोबाइल वापराचे नियम आणि शिस्त लावून घ्यायला हवी. ही शिस्त लावायची म्हणजे मनोरंजन, अभ्यास किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पा या कशासाठीही मोबाइल वापरायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट वेळ ठरवून घ्यायला हवी. त्या वेळेतच मोबाइलला हात लावणार, एकदा मोबाइल हातात घेतला की तो किती वेळ बघणार हेही आधीच ठरवायला हवं. ठरवलेल्या वेळेतच मोबाइलला हात लावण्याचा नियम काटेकोरपणे पाळायला हवा.

- एरवी मोबाइल हातात घेण्याचा मोह होवू नये यासाठी तो लांब ठेवावा. फोनचे नोटिफिकेशन साउंड बंद करुन टाकले की सारखा फोन वाजला म्हणून त्याकडे लक्ष जाणार नाही आणि मोबाइल हातात घेऊन मेसेजेस बघण्याचा मोह होणार नाही

-आई बाबांना आपल्या मोबाइलला पॅरेण्टल लाॅक लावण्यास सांगावे. यामुळे फोनवरचे मनोरंजनाचे पर्याय कमी होतील. हातात फोन घेण्याची कारणं कमी होतील.

- फोनवरचं लक्ष उडण्यासाठी मैदानी खेळ खेळावेत, एखादा छंदाचा क्लास लावून स्वत:ला गुंतून ठेवावं.

- आई बाबांशीही आपल्या अति फोन वापरण्याच्या सवयीबद्दल, त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलायला हवं. आई बाबांनी मोबाइल संबंधी घालून दिलेले नियम त्यांच्याशी वाद न घालता पाळायला हवेत.

- आठवड्यातून एकदा पूर्ण दिवस मोबाइलला हातच लावायचा नाही असा डिजिटल डीटाॅक्स म्हटला जाणारा उपायही करायला हवा.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact